
सामना ऑनलाईन। दुबई
कब्बडीची बादशाहत स्वतःकडे राखत हिंदुस्थानी कब्बडी संघाने दुबईतील पहिल्या कब्बडी मास्टर्स इराणला ४४-२६ असे चिरडत मानाचे विजेतेपद पटकावले. शनिवारी रात्री इराणच्या कडव्या आव्हानाला लीलया सामोरे जात हिंदुस्थानी कब्बडीपटूंनी संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाच्या विजेतेपदाचे मोरपिस खोवले. तीनवेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या हिंदुस्थानने अंतिम लढतीत इराणी चढाईपटूंना डोकेच वर काढू दिले नाही.
अहमदाबादच्या विश्वचषक कब्बडी स्पर्धेत जेतेपदासाठी झुंजणाऱ्या हिंदुस्थान आणि इराण या जगातील बलाढ्य संघांत कबड्डी मास्टर्स स्पर्धेची अंतिम लढत तशी एकतर्फीच झाली. हिंदुस्थानी संघाने इराणवर २ लोण चढवत कब्बडीतील आपली मास्टरी सिद्ध केली. हिंदुस्थानी कर्णधार अजय ठाकूरने या लढतीत ९ गुण तर मोनू गोयतने ६ गुणांची कमाई केली. पूर्वार्धात स्टेडियमचा वीजप्रवाह खंडित झाल्याने सुमारे १० मिनिटे लढत थांबवण्यात आली होती. उत्तरार्धात इराणी कर्णधार अम्मेरहोसेन याने हिंदुस्थानी संघावर धसमुसळ्या खेळाचा आरोप केला. पण पंचांनी तो साफ फेटाळून लावला. हिंदुस्थानी संघाच्या या यशाबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिग राठोड यांनी हिंदुस्थानी कबड्डीपटूंचे अभिनंदन केले आहे.






























































