
सामना ऑनलाईन । रांची
उस्मान ख्वाजाचे शानदार शतक… ऍरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनीसची दमदार फलंदाजी… अन् पॅट कमिन्स, जाय रिचर्डसन व ऍडम झाम्पा यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रांची येथे झालेल्या तिसऱ्या वन डेत यजमान हिंदुस्थानवर 32 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची 123 धावांची शतकी झुंज या लढतीत अपयशी ठरली. मात्र या पराभवानंतरही हिंदुस्थानकडे 2-1 अशी आघाडी कायम आहे. 104 धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजाची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.
कोहली लढला

नागपूर वन डेत 40वे शतक साजरे करणाऱया विराट कोहलीने याही लढतीत शतकी खेळी साकारली. त्याने अवघ्या 95 चेंडूंत एक षटकार व 16 चौकारांसह 123 धावांची खेळी केली. मात्र इतर फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहून धावा करता आल्या नाहीत. महेंद्रसिंह धोनी (26 धावा), केदार जाधव (26 धावा), विजय शंकर (32 धावा), रवींद्र जाडेजा (24 धावा) यांनी थोडीफार कडवी झुंज दिली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही.
त्रिकूट चमकले
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, जाय रिचर्डसन हे तेज गोलंदाज व ऍडम झाम्पा हा फिरकी गोलंदाज चमकला. या तिघांनी निर्णायक क्षणी हिंदुस्थानी फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पॅट कमिन्सने 37 धावा देत तीन, जाय रिचर्डसनने 37 धावा देत तीन आणि ऍडम झाम्पाने 70 धावा देत तीन फलंदाजांना बाद करीत विजयात मोलाचा वाटा उचलला.
शमी, बुमराहने रोखले

जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमीने अखेरच्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी करीत कांगारूंना 313 धावांमध्ये रोखले. एकवेळ ऑस्ट्रेलियन संघ 1 बाद 239 धावा अशा भक्कम स्थितीत असताना त्यांना केवळ 313 धावांपर्यंतच मजल मारता आली. ग्लेन मॅक्सवेलने 47 धावांची, मार्कस स्टोयनीसने नाबाद 31 धावा व ऍलेक्स कॅरीने नाबाद 21 धावांची खेळी केली. कुलदीप यादवने तीन फलंदाज बाद केले.
193 धावांची दणदणीत सलामी

त्याआधी हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ऍरोन फिंच व उस्मान ख्वाजा या सलामीवीरांनी 193 धावांची खणखणीत भागीदारी करताना हिंदुस्थानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने ऍरोन फिंचला 93 धावांवर पायचीत पकडले आणि जोडी फोडली. उस्मान ख्वाजाने एक षटकार व अकरा चौकारांसह 104 धावांची खेळी साकारली.





























































