हिंदुस्थानची सलामीची लढत पाकिस्तानशी

9


सामना ऑनलाईन । ब्रेडा

राष्ट्रकुल स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी विसरून हिंदुस्थानचा हॉकी संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंदुस्थानचा संघ सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भिडेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीची ही ३६वी आवृत्ती असली तरी आशियाई चॅम्पियन आणि आठ वेळचा ऑलिम्पिक विजेत्या हिंदुस्थानसाठी विजेतेपद कायम दूरच राहिले आहे. २०१६च्या सत्रात ‘टीम इंडिया’ने सर्वोत्तम कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाकडून अंतिम फेरीत शूटआउटमध्ये पराभूत होताना रौप्य पदकावर समाधान मानले होते.

राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर नेदरलँडच्या जोर्द मारिन यांच्या ठिकाणी प्रशिक्षकपदाची जबाबदारी हरेंद्र सिंग यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विश्वमानांकनातील अव्वल सहा संघांचा समावेश असून, यावेळी ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना, विश्वमानांकनातील पहिल्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, यजमान नेदरलँड, हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे संघ नशीब अजमावत आहेत. पाकिस्तानशी उद्या सामना झाल्यावर हिंदुस्थानी संघासमोर अर्जेंटिना (२४ जून), ऑस्ट्रेलिया (२७ जून), बेल्जियम (२८ जून) आणि नेदरलँड (३० जून) यांचे आव्हान असणार आहे. पाकिस्तानने तीन वेळा (१९७८, १९८०, १९९४) चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असली तरी प्रत्येक वेळा घरच्या मैदानावर त्यांनी ही कामगिरी केली.

आपली प्रतिक्रिया द्या