रोहितला वर्ल्ड कप पराभवाच्या भरपाईची संधी – गावसकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने आतापर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मायभूमीत कसोटी मालिकेत नमवलेले नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱया हिंदुस्थानी संघाला तो नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे हा पराक्रम हिंदुस्थानसाठी वर्ल्ड कप पराभवाची भरपाईची संधी असल्याचे मत हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त करत संघाला कसोटी क्रिकेटसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघाने सलग दहा विजय नोंदवले, पण 19 नोव्हेंबरच्या रात्री खेळाने दगा दिला आणि हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाकडून हार सहन करावी लागली. हा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला होता. पण आता त्या पराभवाची भरपाई करण्याची संधी हिंदुस्थानला लाभणार असल्याचे गावसकर म्हणाले. हिंदुस्थान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेले 33 वर्षे कसोटी खेळतोय. पण एकदाही आफ्रिकन भूमीवर कसोटी विजय मिळवू शकलेला नाही. हा इतिहास खोडून काढण्याची नामी संधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाला लाभलीय. एक सलामीवीर म्हणूनही तो संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार, अशी आशाही त्यांनी बोलून दाखवली.