तर हिंदुस्थान पाकिस्तानचे तीन तुकडे करेल, इम्रान खानचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानातील सत्ता गमावलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सर्व पत्ते फसल्यानंतर आता त्यांनी हिंदुस्थानच्या विरोधात बोलणे सुरु केले आहे. हिंदुस्थानची थिंक टँक पाकिस्तानचे तीन तुकडे करू इच्छित आहे. त्यामुळे लष्कराने योग्य निर्णय न घेतल्यास पाकिस्तानचे तीन तुकडे होतील असा दावा इम्रान खान यांनी केला. ते म्हणाले की, त्यांच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे ते भारताला आवडत नाहीत.

हिंदुस्थानी थिंक टँक बलुचिस्तान वेगळे करण्याचा विचार करत आहे. हिंदुस्थानी थिंक टँककडे योजना आहेत. पाकिस्तान आत्महत्येच्या मार्गावर असून, योग्य निर्णय न घेतल्यास पहिला बळी हा लष्कराचाच असेल आणि युक्रेनप्रमाणे आपणही अणुबॉम्ब गमावू असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे.

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान बोलत होते. पाकिस्तानला डिफॉल्ट करण्याचा धोका असल्याचे ते म्हटले आहेत. ही पाकिस्तान आणि लष्कराची खरी समस्या आहे. लष्कराने योग्य निर्णय न घेतल्यास त्यांचा नाश होईल आणि याचा पहिला बळी लष्करच असेल हे मी तुम्हाला लेखी लिहून देत ​​आहे. एकदा देश उद्ध्वस्त झाला की आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानला अण्वस्त्रे सोडण्यास सांगेल, जसे 1990 च्या दशकात युक्रेनने केले होते, असा इशारा त्यांनी दिला.

बलुचिस्तानला वेगळा देश बनवण्यासाठी हिंदुस्थानी थिंक टँकचा आग्रह

परदेशातील भारतीय थिंक टँक बलुचिस्तानचा वेगळा देश बनवण्यासाठी आग्रही आहेत. नवाझ शरीफ आणि आसिफ अली झरदारी अमेरिका, हिंदुस्थान आणि इस्रायलची युती करण्यासाठी नेहमीच आनंदाने काम करतील, म्हणून शहबाज शरीफ यांचे सरकार अमेरिकेला प्रत्येक प्रकारे संतुष्ट करण्याचा प्रयत्न करेल, असे ते म्हणाले. शाहबाज शरीफ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की सरकारची पाकिस्तानला मजबूत करण्याची योजना नाही. मला हटवून शाहबाज शरीफ सत्तेवर येताच हिंदुस्थानात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मी स्वतंत्र परराष्ट्र धोरण पाळत असल्यामुळे भारताला मी आवडत नसल्याचा दावाही त्यांनी केला.