
सामना ऑनलाईन । सिडनी
विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 क्रिकेट मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर दुसरा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला होता. त्यानंतर तिसऱ्या व निर्णायक लढतीत बाजी मारून हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला वरचढ ठरू दिले नाही. कृणाल पंडय़ाची अफलातून गोलंदाजी आणि कर्णधार विराट कोहलीची नाबाद अर्धशतकी खेळी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. 4 बळी टिपणारा कृणाल पंडय़ा सामन्याचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 बाद 164 धावसंख्या उभारली. डार्सी शॉर्ट (33) व कर्णधार ऍरोन फिंच (28) यांनी ऑस्ट्रेलियाला 68 धावांची सलामी देत झकास सुरुवात करून दिली होती, मात्र त्यानंतर कृणाल पंडय़ाने त्यांनी आघाडीची फळी कापून काढताना शॉर्टसह ग्लेन मॅक्सवेल (13), बेन मॅक्डोरमोट (0) व ऍलेक्स कॅरी (27) यांना बाद करून ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चाप लावला. कुलदीप यादवने फिंचचा महत्त्वपूर्ण बळी मिळविला. ख्रिस लीनला (13) जसप्रीत बुमराहने धावबाद केल्यानंतर मार्क्स स्टोइनिस (नाबाद 25) व नाथन कुल्टर नील (नाबाद 13) यांनी ऑस्ट्रेलियाला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. हिंदुस्थानकडून कृणाल पंडय़ाने 36 धावांत 4 फलंदाज बाद केले, तर कुलदीपला एक बळी मिळाला.
धडाकेबाज सलामीनंतर विराटचा विजयी ‘तडाखा’
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले 165 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 19.4 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 168 धांवा करून पार केले. रोहित शर्मा (23) व शिखर धवन (41) यांनी 5.3 षटकांत 67 धावांची सलामी देत हिंदुस्थानला खणखणीत सुरुवात करून दिली. धवनने 22 चेंडूंत 6 चौकारानिशी 2 षटकार ठोकले, तर रोहितने 16 चेंडूंत एका चौकारासह 2 षटकार लगावले. मिशेल स्टार्क आणि ऍडम झम्पा यांनी अनुक्रमे धवन व रोहितला बाद केले. त्यानंतर विराट कोहलीने फलंदाजीची सूत्रे हाती घेत विजय हातातून निसटणार नाही याची खबरदारी घेतली. लोकेश राहुल (14) व रिषभ पंत (0) लागोपाठच्या षटकात बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकच्या (नाबाद 22) साथीने विराटने हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने आपल्या नाबाद 61 धावांच्या खेळीत 41 चेंडूंना सामोरे जाताना 4 चौकार व 2 षटकार लगावले. दिनेश कार्तिकनेही 18 चेंडूंत एक षटकार व एका चौकारासह नाबाद खेळी सजविली. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा, ग्लेन मॅक्सवेल व ऍण्ड्रय़ू टाइ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.




























































