सॅफ महिला चॅम्पियनशिप, हिंदुस्थानचे लक्ष्य पाचवे जेतेपद

40

सामना प्रतिनिधी । बिराटनगर

हिंदुस्थानचा महिलांचा फुटबॉल संघ उद्या सॅफ या प्रतिष्ठेच्या फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये सलग पाचव्यांदा अजिंक्य होण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल. हिंदुस्थानसमोर जेतेपदाच्या लढतीत यजमान नेपाळचे आव्हान असणार आहे.

हिंदुस्थानने उपांत्य फेरीच्या लढतीत बांगलादेशचा 4-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. या लढतीत इंदुमती काथीरेसान हिने दोन व दालिमा, मनीषा यांनी प्रत्येकी एक गोल केला. हिंदुस्थानने या स्पर्धेत आतापर्यंत 15 गोलांचा पाऊस पाडलाय. सलामीच्या लढतीत मालदीवचा 6-0 असा फडशा पाडल्यानंतर हिंदुस्थानने श्रीलंकेला 5-0 अशा फरकाने सहज हरवले. इंदुमती काथीरेसान हिने आतापर्यंत 4 गोल झळकावत स्पर्धेत सर्वाधिक गोल करणार्‍यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

नेपाळ चौथ्यांदा हरणार

हिंदुस्थानच्या झंझावाती खेळासमोर नेपाळचा निभाव लागणार नाही हे जवळपास निश्चित आहे. याआधी नेपाळला तीन वेळा अंतिम फेरीत हार सहन करावी लागली आहे. त्यामुळे साखळी फेरीत सहा गोलांसह प्रतिस्पर्ध्यांना हरवणार्‍या नेपाळला हिंदुस्थानचे आव्हान परतवून लावण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार हे निश्चित. नेपाळने उपांत्य फेरीत श्रीलंकेला 4-0 अशा फरकाने हरवत आगेकूच केली.

निर्भेळ यश

हिंदुस्थानने या स्पर्धेत आतापर्यंत निर्भेळ यश संपादन केले आहे. 2010 सालापासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सलग चार वेळा चॅम्पियन होण्याचा मान हिंदुस्थानने संपादन केला आहे. हिंदुस्थानने 2010, 2012, 2014, 2016 या सालांमध्ये झळाळता करंडक पटकावला. या दरम्यान, हिंदुस्थानने तीन वेळा नेपाळला व एक वेळा बांगलादेशला धूळ चारत पहिल्या स्थानावर झेप घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या