
पूर्व लडाखमध्ये हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य गेल्या 5 महिन्यांपासून आमनेसामने आहे. कमांडर लेव्हलच्या अनेक बैठका होऊनही चीन मागे हटण्यास तयार झालेला नाही. त्यामुळे आगामी थंडीचा मोसम पाहता हिंदुस्थानने पूर्ण तयारी केली आहे. दीर्घकाळ येथे टिकून राहण्यासाठी सैनिक, रसद उतरवली जात असून चिनी सैन्याच्या धमक्यांना भीक न घालता आता टी-90 आणि टी-72 रणगाडे तैनात केले आहेत.
लष्कराने पूर्व लडाखमधील एलएसीवर हे युद्धसज्ज रणगाडे तैनात केले आहेत. 14, 500 फूट उंचीवर असणाऱ्या चुमार-डेमचोक भागात रणगाड्यांची रेजिमेंट तैनात करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली. यासह बीएमपी-2 कॉम्बैट व्हीकल येथे रवाना करण्यात आले आहेत. जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र असणाऱ्या या भागात हिंदुस्थानने अत्याधुनिक रणगाडे तैनात करून चीनला एकप्रकारे इशारा दिला असून कोणत्याही आगळीकीला तोंड देण्यात तयार असल्याचे दाखवून दिले.
टी-90 आणि टी-72 रणगाडे उणे 40 अंश तापमानातही ऑपरेट केले जाऊ शकतात. आगामी थंडीच्या काळात येथे बर्फ पडण्यास सुरुवात होईल आणि तापमान खाली जाईल, या गोष्टी ध्यानात घेऊन हे रणगाडे येथे तैनात केले गेले आहेत. याबाबत लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, लडाखमध्ये थंडीच्या मोसमात वातावरण खराब होते. मात्र याचा सामना करण्यात हिंदुस्थान तयार आहे. उच्च कॅलरीजयुक्त आणि न्यूट्रीशनयुक्त रेशन येथे पोहोचवण्यात आले आहे. तसेच आवश्यक इंधन, तेल, थंडीचे कपडे, वातावरण गरम ठेवण्यासाठीची उपकरणे येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
#WATCH Indian Army deploys T-90 & T-72 tanks along with BMP-2 Infantry Combat Vehicles that can operate at temperatures up to minus 40 degree Celsius, near Line of Actual Control in Chumar-Demchok area in Eastern Ladakh.
Note: All visuals cleared by competent authority on ground pic.twitter.com/RiRBv4sMud
— ANI (@ANI) September 27, 2020
दरम्यान, थंडीच्या दिवसात या भागात तैनात केलेल्या रणगाड्यांचे मेंटेनन्स एक आव्हान असते, असे मेजर जनरल अरविंद कपूर यांनी सांगितले. थंडीच्या दिवसात येथे रात्रीचे तापमा उणे 35 अंश खाली जाते. यासह थंडगार वारेही असल्याने रणगाडे, बंदुका आणि युद्धातील वाहने यांच्या मेंटेनन्सचे आव्हान असते. मात्र अशा वातावरणात मोर्चा सांभाळण्यासाठी ‘फायर अँड फ्यूरी कॉर्प्स’ची तुकडी येथे तैनात करण्यात आली आहे.
























































