
ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डय़ू प्लेसिसच्या 61 चेंडूंतील 126 धावांच्या भागीने बंगळुरूला सामन्यावर पकड मिळवून दिली होती. पण ही जोडी फुटताच सहजसाध्य असलेले विजयी लक्ष्य बंगळुरूसाठी अवघड होत गेले आणि धोनीच्या कल्पक नेतृत्वाने चेन्नईला 8 धावांनी विजय मिळवून दिला.
चेन्नईचे 227 धावांचे आव्हान बंगळुरूसाठी सोप्पे नव्हते. त्यातच विराट कोहलीचा पहिल्याच षटकात आकाश सिंहने त्रिपळा उडवला. दुसऱया षटकात लोमररसुद्धा बाद झाला. मात्र त्यानंतर डय़ू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल जोडीने षटकारांची त्सुनामीच आणली. मॅक्सवेलने 24 चेंडूंत अर्धशतक तर 36 चेंडूंत 76 धावा काढताना 8 षटकार मारले. दोघांनी शतकी भागीसुद्धा रचली. हे दोघे मैदानात उभे होते तेव्हा बंगळुरू मोठा विजय मिळवण्याची चिन्हे दिसत होती. पण ही जोडी फुटताच बंगळुरूच्या डावाला नजर लागली. डय़ू प्लेसिसही बाद झाला. मग दिनेश कार्तिकने 28 धावा काढत संघाला विजयासमीप नेले. तो बाद होताच त्यांच्या विजयाचे अंतरही वाढू लागले. धोनीने तेव्हा पथिराना, देशपांडेचा अचूक वापर करत बंगळुरूला विजयाजवळ येऊ दिले नाही.
तत्पूर्वी चेन्नईने डेव्हन कॉन्वेच्या 83, शिवम दुबेच्या 52 धावांच्या झंझावातामुळे 20 षटकांत 6 बाद 226 असे जबरदस्त आव्हान उभारले होते. चेन्नईसाठी नेहमीच धडाकेबाज फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड आज अपयशी ठरला. मात्र त्यानंतर डेव्हन कॉन्वेने अक्षरशः चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 6-6 चौकार-षटकार ठोकत 83 धावा काढल्या. त्याला अजिंक्य रहाणेने सुरेख साथ दिली. दोघांनी 72 धावांची भागी रचली. रहाणेने 20 चेंडूंत 37 धावा फटकावल्या. रहाणेनंतर कॉन्वेने शिवम दुबेबरोबर आपला घणाघात कायम ठेवला. दोघांनी उत्तुंग षटकार ठोकत बंगळुरूच्या गोलंदाजांना हैराण केले. 37 चेंडूंत 90 धावांची भागी रचली. कॉन्वेला शतकाची संधी होती, पण हर्षल पटेलने त्याची मधली यष्टी वाकवली. शिवमचा झंझावात 52 धावांवर थांबला. त्यानंतर रायुडू, मोईन खान, जाडेजाने चेन्नईला 226पर्यंत नेले.



























































