लांब पल्ल्याच्या गाड्यांना दिला जातो लाल, निळा, हिरवा रंग? वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी रेल्वेचं जाळं हे जगातलं चौथं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं नेटवर्क आहे. या मार्गाचा वापर करून रोज लाखो लोक प्रवास करतात. श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव न करता लांब पल्ल्याच्या प्रवासाकरता रेल्वेची निवड केली जाते. कारण, बस किंवा विमानाच्या तुलनेने स्वस्त आणि आरामदायी असा रेल्वेचा प्रवास असतो.

आपण सगळ्यांनीच कधी ना कधी रेल्वेतून प्रवास केला आहे. वेगवेगळ्या अर्थपूर्ण नावांच्या आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगलेल्या या लांबपल्ल्यांच्या गाड्यांनी तुमचं लक्ष जरूर वेधलं असेल. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, की या गाड्यांचे रंग वेगवेगळे का असतात?

गाड्यांचे रंग वेगवेगळे असण्यामागे काही कारणं आहेत. वेगवेगळ्या ट्रेनचे प्रवास हे लांबवर किंवा कमी अंतराचे असतात. त्यांच्या वेगात, थांब्यातही फरक असतो. त्यात दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांनुसारही या गाड्यांचे रंग ठरतात.

लाल रंग –

शताब्दी किंवा राजधानी एक्प्रेसला लाल रंगाचे डबे असतात. ते डबे अॅल्युमिनियमपासून बनवले जातात. त्यामुळे ते इतर ट्रेन्सच्या डब्यांच्या तुलनेने हलके असतात. त्यामुळेच त्यांना वेगवान गाड्यांमध्ये वापरलं जातं. 2000 साली जर्मनीहून आणले गेलेले हे डबे 160 ते 200 किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. डिस्क ब्रेक असल्याकारणाने फक्त आपत्कालीन कारणासाठीच यांना त्वरित थांबवता येऊ शकतं.

निळा रंग –

हिंदुस्थानी रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त रेल्वेगाड्या निळ्या रंगाच्या असतात. या डब्यांना इंटिग्रल कोच असं म्हटलं जातं. हे डबे एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये लावले जातात. ते लोखंडाचे बनवलेले असतात. त्यामुळे त्यांना 70 ते 140 प्रतिकिमीच्या वेगानेच चालवता येऊ शकतं. त्यांना थांबवण्यासाठी एअरब्रेकचा वापर केला जातो.

हिरवा आणि तपकिरी रंग –

हिरव्या रंगाच्या डब्यांचा वापर गरीबरथ सारख्या ट्रेनमध्ये केला जातो. रंगांत वैविध्य आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा रंग आणला होता. त्या रंगावर अनेक प्रकारची चित्रंही काढलं जातं, जेणेकरून त्या डब्याला आकर्षक रूप देता येईल. तसंच, तपकिरी रंगाच्या डब्यांचा वापर छोट्या मार्गावर चालणाऱ्या मीटर गेज ट्रेन्ससाठी केला जातो.