डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला!

दादरच्या इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. त्यामुळेच सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत एक चांगला कार्यक्रम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर एमएमआरडीएने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली होती. शुक्रवारी त्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र हा सोहळा पुढे ढकला आणि सर्व मान्यवरांना निमंत्रित करून नवी तारीख निश्चित करा आणि पूर्ण नियोजनाअंती एक चांगला सोहळा आयोजित करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

कुणीही राजकारण करू नये

इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार आहे. अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी संबंधितांच्या लक्षात आणून दिले आहे. यात कुणीही राजकारण करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या