
सामना प्रतिनिधी, भाईंदर
संक्रांत आता काही तासांवर येऊन ठेपली असतानाच पतंग उडवण्यासाठी आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. पतंग आणि संक्रांत यांचे जवळचे नाते असून या पतंगबाजीमध्ये जीवघेणी स्पर्धाही होते. त्यात धारदार मांज्यामुळे आकाशात मुक्तपणे विहार करणारे पक्षी जखमी होऊन जमिनीवर कोसळतात, अशा पक्ष्यांवर मोफत उपचार करण्यात येणार असून त्यासाठी खास मेडिकल कॅम्प भरवला जाणार आहे. या उपक्रमांकरिता अहिंसा चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला असून हेल्पलाइनदेखील तयार केली आहे.
आजपासूनच चॅरिटेबल ट्रस्टच्या मेडिकल कॅम्पची तयारी सुरूही केली आहे. भाईंदरमधील पोरवाल हायस्कूलजवळ हा कॅम्प भरवला जात असून सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पक्षीमित्र तसेच डॉक्टरही उपचारासाठी सज्ज राहणार आहेत. कौशल शहा, विक्रम पारिख, धर्मेंद्र चोपडा, नितीन जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन अहिंसा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या माध्यमातून पतंग उडवताना जखमी झालेल्या पक्ष्यांवर पदरमोड करून उपचार केले जातात.
येथे संपर्क साधा
भाईंदर शहरात मोकळे मैदान तसेच गच्चींवर संक्रांतीनिमित्त तरुण-तरुणी उंच पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. पतंग काटाकाटी करत असताना अनेकदा कबूतर, चिमणी, कावळा, घार या पक्ष्यांवरच ‘संक्रांत’ येऊन त्यांच्या जिवावर बेतते. पतंगीमुळे जखमी झालेला एखादा पक्षी आढळून आल्यास दक्ष नागरिकांना तसेच पक्षीप्रेमींना 9821391283 (कौशल शहा) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.



























































