
सामना ऑनलाईन । मुंबई
नौदलातून निवृत्त झालेल्या आयएनएस विराट या युद्धनौकेचे संग्रहालय अथवा हॉटेलात रूपांतर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत दिली. विराट युद्धनौकेचे संग्रहालयात अथवा या नौकेवर हॉटेल सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता.
हा प्रस्ताव सरकारने स्वीकारला असून त्याला तत्त्वतः मंजुरी दिल्याचेही संरक्षणमंत्री म्हणाल्या. राज्यसभेत लेखी उत्तर सादर करून त्यांनी ही माहिती दिली. हिंदुस्थानी नौदलात 30 वर्षे सेवा बजावल्यानंतर आयएनएस विराट ही युद्धनौका गेल्याच वर्षी निवृत्त झाली. एअरक्राफ्ट कॅरियर म्हणून नावारूपाला आलेल्या या युद्धनौकेने आपल्या सुरुवातीच्या काळात अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या फॉक्लॅण्ड युद्धात मोठा विजय मिळविला होता. रॉयल ब्रिटिश नेव्हीसाठी हे युद्ध झाले होते.





























































