
>> शिल्पा सुर्वे
प्रत्येकाच्या मनात ‘किरवंत’ दडलेला असतो. ‘किरवंत’ या शब्दात इतरांना तुच्छ लेखण्याची भूमिका दिसून येते. दुसऱयाचे विचार पटले नाहीत तरी त्याला कमी लेखले जाते. मी गांधींच्या बाजूचा नाही की आंबेडकरांच्या. मी प्रश्नांच्या बाजूचा आहे. एखादा विषय जाणवला तर त्याचा शोध घेणे, माझ्या आकलनाप्रमाणे त्याची मांडणी करणे ही माझी भूमिका… सांगताहेत 99 व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी.
नागपूरचे खेडेगाव ते स्वप्ननगरी मुंबई आणि आता नाटय़ संमेलनाध्यक्षाची खुर्ची. आज मागे वळून या प्रवासाकडे कसे बघता?
– आनंददायी आणि खूप काही शिकवणारा असा हा प्रवास आहे. नागपूरमधील छोटंसं गाव कारगाव. खरं तर पोटापाण्यासाठी मुंबईला आलो. नागपूरच्या कॉलेजात शिकत असताना पोस्ट अँड टेलिग्राफची जाहिरात आली होती. मी रेल्वे मेल सर्व्हिससाठी फॉर्म भरला. माझी निवड झाली. त्यासाठी बडोद्याला तीन महिन्यांचे ट्रेनिंग पार पडल्यावर थेट माझी मुंबईला पोस्टिंग झाली. सांताक्रुझच्या एअरपोर्ट सॉर्टिंग ऑफिसमध्ये जॉइनिंग रिपोर्ट दिला. त्यावेळी राहण्याची कुठेच व्यवस्था नव्हती. रात्री अन्य दोघांसोबत ऑफिसातच रात्र काढली. दुसऱया दिवशी राहण्याच्या विवंचनेत असताना एका गुजराती गृहस्थाने जवळ येऊन विचारपूस केली. ‘‘मालाडमध्ये मालवणीत माझी एक खोली आहे, तिथे रहा’’ असे आम्हाला सांगितले. माणुसकीचा पहिला अनुभव मुंबईत आला. मुंबईत अनेक जण स्वप्नं उराशी बाळगून येतात. ही मुंबईनगरी ती पूर्णत्वास नेण्यास पंखांचे बळ देते. मुंबईची ती ताकद आहे. फक्त इथे सावध राहिलं पाहिजे. कलाकार असाल तर प्रश्न आणखीच वेगळे असतात. मुंबईत आलो तेव्हा मी नाटय़ लेखनास सुरुवातही केली नव्हती आणि आता नाटय़ संमेलनाध्यक्ष झालो.
‘घोटभर पाणी’ एकांकिका लिहिलीत आणि मोठं यश तुम्हाला मिळालं…
– तसा मी मुंबईत येण्याआधीपासून नाटकात काम करीत होतो. वयाच्या 15 व्या वर्षी ‘उमाजी नाईक’ या नाटकात काळोजी या खलनायकाची भूमिका मी केली होती. गाण्याची, अभिनयाची आवड होती. मुंबईत आल्यावर नाटय़ सहकार ही संस्था काढली. बीपीटीच्या एकांकिका स्पर्धेदरम्यान रणजित मसुरेकर म्हणाला, ‘‘कथा कसल्या लिहितोस, एकांकिका लिही.’’ मी ‘घोटभर पाणी’ लिहिली. ‘‘गावातील शोषित समाजाच्या वाटय़ाला साधं पाणीही मिळू नये?’’ हा प्रश्न घेतला. त्यावेळी ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ सुरू होती. तिचा फोलपणा दिसत होता. संपूर्ण क्रांतीचा नारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ‘घोटभर पाणा’ आलं. बस्स! तिथून माझा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धेत ही एकांकिका झाली. पुरस्कारांची बरसात झाली. सामाजिक प्रश्नांचे भान असलेल्या एकेका तरुण गटाने शंभर शंभर प्रयोग केले. ‘घोटभर पाणी’ने मोठं यश दिलं.
‘किरवंत’कार ही तुमची नवी ओळख बनली. ‘किरवंत’च्या संशोधनात्मक प्रवासाविषयी सांगा…
– 1981चा काळ होता तो. ‘कुणाचे ओझे’ ही माझी एकांकिका एक गट बसवत होता. त्यात करी रोडचा एक मुलगा काम करीत होता. तालीम बघायला मी त्याच्या घरी गेलो. तेव्हा तो म्हणाला, ‘‘तालमीला जास्त वेळ मिळत नाही. कारण मी स्मशानात जातो ना!’’ मी त्याला विचारले, ‘‘काय करतोस स्मशानात?’’ तेव्हा तो काही सांगायला तयार होईना. नंतर सांगेन एवढंच म्हणाला. दोन दिवसांनी तो मुलगा भेटल्यावर मी पुन्हा त्याला हाच प्रश्न केला, तर तो भडकलाच. ‘‘मी नाही जात स्मशानात’’ असे म्हणून गप्प झाला. त्याची ही भानगड जाणून घ्यायचा मी चंग बांधला. मालाडच्या स्मशानभूमीत काम करणाऱया एका व्यक्तीची भेट घेतली तेव्हा वास्तवाच्या अधिक जवळ गेलो. स्मशानात काम करणाऱया ब्राह्मणाच्या व्यथा समजल्या. स्मशानात क्रियाकर्मे करणाऱयांना ‘किरवंत’ म्हणतात. त्यांना समाजात मानसन्मान मिळत नाही. त्यांच्या बायकांना समारंभाला बोलावले जात नाही. आल्या तर हाकलून लावतात. यासंदर्भातील चर्चेतून ‘निर्णयसिंधू’, ‘गरुडपुराण’ ग्रंथांचे संदर्भ पुढे आले. सावंतवाडीला जाऊन खरंखोटं जाणून घेतलं. ‘किरवंत’ लिहिलं. सारा संशोधनात्मक प्रवास होता. एवढं करूनही नाटकाचा राज्य नाटय़ स्पर्धेत नंबर आला नाही. पुढे ‘किरवंत’ रंगभूमीवर आलं. डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी यांनी काम केले. किरवंतने मोठी ओळख मिळवून दिली.
तुम्ही ‘किरवंत’कडे कसे बघता?
– ‘किरवंत’ या शब्दात इतरांना तुच्छ लेखण्याची भूमिका दिसून येते. असंही आपण सहजपणे हरघडी दुसऱयाला तुच्छ लेखत असतो. दुसऱयाचे विचार पटले नाही, तरी त्याला तुच्छ लेखत असतो. प्रत्येकाच्या मनात ‘किरवंत’ असतो, तो मेला पाहिजे. दुसऱयाला सन्मान देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे.
तुम्हाला व्यावसायिक नाटकं लिहावीशी वाटली नाहीत का? गंभीर नाटक लिहिणारी मंडळी आज शोधावी लागतात का?
– व्यावसायिक रंगभूमीसाठी लिहिणारे खूप जण आहेत. प्रत्येक लेखकाला वाटतं की, आपल्याला लोकांनी ओळखावे, व्यवसाय करून चार पैसे मिळवावेत यात काही गैर नाही. पॉप्युलॅरिटी वेगळी गोष्ट आहे. मला कधी ते जमलं नाही. महाबळेश्वरच्या संमेलनात मला प्रश्न विचारला गेला, ‘‘गांधी -आंबेडकर’ लिहून तुम्ही गांधींवर अन्याय केलाय?’’ आंबेडकरांची बाजू घेतली. तेव्हा मी माझी भूमिका मांडली. मी म्हटलं की, ‘‘गांधींच्या बाजूचा नाही की आंबेडकरांच्या. मी प्रश्नांच्या बाजूचा आहे. एखादा विषय जाणवला तर त्याचा शोध घेणे, माझ्या आकलनाप्रमाणे त्याची मांडणी करणे ही माझी भूमिका. या पद्धतीचे लेखन करणारे लोक नाहीत. आणखी इतर लोक असते तर माझी जबाबदारी कमी झाली असती. मी वेगळा असा फार्स, कौटुंबिक नाटकं, विनोदी असं लिहू शकलो असतो. माझ्या बाबतीत असे म्हणता येईल की, मला काळाने उसंत घेऊ दिली नाही. इतके वेगवेगळे प्रश्न रोज निर्माण होतात. नक्षलवादाचा प्रश्न तीक्र झालाय. आधीही नक्षलवाद होता. आत त्यात बुद्धीवादी माणसं येतात हे विषय मांडले पाहिजेत. मला विषय शोधायला जावं लागत नाही. ते आजूबाजूला असतात. रोजच्या वर्तमानपत्रांतील बातम्या, नाक्यानाक्यावरच्या चर्चा यातून विषय सापडतात.
प्रायोगिक रंगभूमीचे प्रश्न सुटतील का?
– ‘‘प्रायेगिक रंगभूमीला थिएटर कधी मिळणार?’’ याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. हे काम आतापर्यंत का झालं नाही. नुसती आश्वासने मिळाली. प्रायोगिक थिएटरसाठी जेव्हा आपण इंटिमेंट थिएटरची मागणी करतो, तेव्हा प्रायोगिकला वाहून घेतलेले किती इंटिमेंट रंगकर्मी आहेत याचा विचार मनात येतो. लोकांना विचारांची बैठक नको असते. जर नाटकातून धंदा होणार नसेल तर लाखोंचा खर्च कसा वसूल होणार? लाखोचा खर्च वसूल करून देण्याची जबाबदारी केवळ कलाकार किंवा दिग्दर्शकांची नाही, तर समाजाचीही आहे. मराठीला प्रगल्भ करण्याची जबाबदारी समाजाची आहे.
काही लिहायचं राहून गेलंय असं वाटतंय का?
– खरं सांगायचं तर माझ्याकडून बऱयापैकी लिहून झालंय असं वाटतंय, थांबायला हरकत नाही. तेच तेच विषय नव्याने येतात, येत राहतात. सध्या ‘कळीबंद पाऊस’ लिहितोय. वयात येणाऱया मुलांवर नाटक आहे. त्याचे दोन प्रवेश लिहून झालेत. नक्षलवादावरचं ‘छावणी’ तयार आहे. गेल्या 70 वर्षांत सामान्य माणसाला न्याय मिळाला नाही. न्याय मिळणार नसेल तर भविष्यात काय घडू शकतं याची पार्श्वभूमी नाटकाला आहे. वर्तमानाचा विचार करता काही करायचं राहिलं नाही असं वाटतं.





























































