
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार डेव्हीड हेडली आणि तहव्वूर राणा यांना लवकरच हिंदुस्थानमध्ये आणले जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) एक पथक नुकतेच अमेरिकेत गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांबरोबर हेडली व राणा यांच्या प्रत्यार्पणाबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याने हेडली व राणा यांना हिंदुस्थानात आणण्याचा एनआयएचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या डेव्हिड व राणा अमेरिकेतील तुरूंगात आहेत. हे दोघेही लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे एजंट म्हणून काम करायचे.
याआधी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे हेडलीला मुंबई न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. हेडली पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक असून लश्कर ए तोयबासाठी काम करतो. तर तहव्वुर राणाही पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून शिकागोमधून तो दहशतवादी कारवायांची सूत्रे हलवतो. तो हेडलीचा साथीदार असून मुंबईवरील हल्ल्यातही त्सतो सामील होता. हल्ल्याआधी हेडलीने मुंबईबद्दल सर्व आवश्यक ती माहिती गोळा केली होती. त्यानंतर पाकिस्तानमधील लश्कर ए तोयबाच्या शिबिरातही तो गेला होता. मुंबई हल्ल्याआधी तो हिंदुस्थानमध्ये आला होता. त्यावेळी त्याने हिंदुस्थानच्या विविध ठिकाणांची रेकी केली होती.
हेडली 2006 सप्टेंबर ते 2008 जुलै या दरम्यान पाच वेळा हिंदुस्थानमध्ये येऊन गेला होता. ज्या ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखली गेली होती. त्या ठिकाणांचे फोटोही त्याने काढले होते. मुंबई हल्ल्याप्रकरणी 24 जानेवारी 2013 रोजी अमेरिकेच्या एका न्यायालयाने हेडलीला दोषी ठरवत 35 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
मुंबईवरील 26/11 हल्ला लश्कर ए तोयबाने घडवला होता. या हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या फ्रॉग मॅन कमांडोने लश्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. याचा खुलासा हेडलीने त्याच्या कबुलीजबाबात केला होता. या हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या फ्रॉग मॅन कमांडोने दहशतवाद्यांना हिंदुस्थानमध्ये घुसण्याचे कसे प्रशिक्षण दिले याबद्दलही हेडलीने एनआयएला सांगितले होते.
























































