
गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन ‘सुपर ओव्हर’मध्ये पराभूत होऊन आलेल्या संघात सामना रंगला. यंदाच्या हंगामातील दोन शतकवीर पंजाबच्या संघात होते, मात्र मुंबईच्या गोलंदाजीपुढे त्यांची डाळ शिजली नाही. मुंबईने पंजाबला 48 धावांनी पराभूत केले. या विजयासह मुंबई गुणतालिकेत नंबर एकवर पोहोचली आहे.
मुंबईच्या विजयात कर्णधार रोहित शर्मा, किरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी मोठे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 4 विकेट्स गमावून 191 धावा केल्या. मुंबईकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 45 चेंडूत 70 धावा केल्या. पांड्या आणि पोलार्ड यांनी अखेरच्या काही षटकात तुफानी फटकेबाजी केली.
मुंबईने 14 षटकात 3 विकेट्स गमावून 87 धावा केल्या होत्या. मुंबईचा संघ 150 ते 155 धावा करेल असे वाटत असताना रोहित, पांड्या आणि पोलार्डने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. अखेरच्या 6 षटकात या तिघांनी तब्बल 104 धावांची लयलूट केली. पांड्या आणि पोलार्ड यांनी 23 चेंडूत 63 धावांची भागिदारी केली.
IPL 2020 – ‘हिटमॅन’चा नवा पराक्रम, अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा फक्त तिसरा खेळाडू
मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात दमदार झाली. राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी तीन षटकात 33 धावा करत सामना एकतर्फी होणार नाही हे दाखवून दिले. मात्र बुमराहने मयांकचा त्रिफळा उडवत पंजाबला पहिला धक्का दिला. यानंतर नियमित अंतराने पंजाबचे फलंदाज बाद होत गेले. अखेर पंजाबला संघ 20 षटकात 8 बाद 143 वर रोखत मुंबईने 48 धावांनी विजय मिळवला.
मुंबईकडून जसप्रीत बुमराह, राहुल चहर आणि जेम्स पॅटीन्सन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तसेच ट्रेंट बोल्ट आणि कृनाल पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.





























































