आयपीएलच्या लिलावाची कोटी कोटींची उड्डाणे; 590 क्रिकेटपटूंचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत असतानाच आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) लिलावाचे जोरदार पडघम वाजू लागले आहेत. यंदाचा 15 आयपीएल हंगाम पुणे , मुंबई ,कोलकाता,बंगुळुरु या मोठ्या शहरात रंगणार असल्याने या लीगची चुरस अधिकच वाढणार आहे. आयपीएलचा यंदाचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगुळुरु येथे रंगणार आहे.

लीगमधील 10 संघांनी (फ्रॅंचाईस ) या लिलावासाठी एकूण 561.5 कोटी रुपये साठवल्याची माहिती मिळाली आहे. या लिलावात देश-विदेशातील एकूण 590 क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. त्यात 220 विदेशी क्रिकेटपटू असणार आहेत. यंदा 370 हिंदुस्थानी खेळांडूंमध्ये अंडर 19 विश्वचषकात आपल्या खेळाचा जलवा दाखवणाऱ्या टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनाही आपले नशीब आजमावता येणार आहे.

जगातील स्टार क्रिकेटपटू एकत्र खेळताना पाहण्याची संधी देणाऱ्या आयपीएलचा 15 हंगाम आता अधिकच चुरशीचा होणार आहे. देशातील कोरोना आता नियंत्रणात आहे. त्यामुळे यंदा क्रिकेटशौकिनांना यंदा आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचा खेळ प्रत्यक्ष स्टेडिअमवर जाऊन पाहता येणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या 590 क्रिकेटपटूंमध्ये 228 राष्ट्रीय संघांसाठी खेळणारे (कॅपड) आणि 355 राष्ट्रीय संघात अद्याप स्थान न मिळवू शकलेले (अनकॅपड ) खेळाडूंचा समावेश आहे. उर्वरित 7 असोसिएटेड देशांचे क्रिकेटपटू आहेत.

यंदाच्या 15 व्या आयपीएलसाठीच्या लिलावात हिंदुस्थानी स्टार खेळाडूंच्या खरेदीसाठी 10 संघांत चुरस बघायला मिळणार आहे. या स्टार खेळाडूंमध्ये शिखर धवन,श्रेयस अय्यर,रविचंद्रन अश्विन,मोहम्मद शमी,ईशान किशन,अजिंक्य रहाणे,सुरेश रैना,युजवेंद्र चहल,वॉशिंग्टन सुंदर,शार्दूल ठाकूर,दीपक चहर,इशांत शर्मा ,उमेश यादव यांचा समावेश आहे. याशिवाय विदेशी क्रिकेटर फाफ डुप्लेसिस ,डेविड वॉर्नर ,कागिसो रबाडा,ट्रेंट बोल्ट ,क्विंटन डिकॉक,जॉनी बेयरस्टो,जेसन होल्डर,डवेन ब्राव्हो,शाकिब अल हसन आणि वनिंदूं हंसरंगा यांना आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स ,दिल्ली कॅपिटल्स,कोलकाता नाईटरायडर्स,लखनौ सुपर जायन्टस, मुंबई इंडियन्स,पंजाब किंग्स ,राजस्थान रॉयल्स ,रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरु ,सनरायझर्स हैदराबाद आणि टीम अहमदाबाद हे 10 संघ लिलावात बाजी लावणार आहेत.

देशातील स्टार क्रिकेटपटूंसोबत सध्या अंडर 19 विश्वचषकात आपल्या पराक्रमाचा डंका वाजवणारे यश धूळ ,विकी ओस्तवाल ,राजवर्धन हंगरगेकर,होतकरू युवा खेळाडू देवदत्त पड्डीकल ,हर्षल पटेल,कृणाल पंड्या,शाहरुख खान,दीपक हुडा,आवेश खान यांनाही यंदाच्या आयपीएल लिलावात मालामाल होण्याची संधी लाभणार आहे.

असे असतील खेळांडींचे दर

– 48 प्रमुख क्रिकेटपटूंसाठी सर्वाधिक राखीव दर 2 कोटी रुपये
– 20 खेळांडूंसाठी सर्वाधिक राखीव दर 1.5 कोटी रुपये
– 34 क्रिकेटपटूंसाठी राखीव दर 1 कोटी रुपये