IPL 2023 बंगळुरूत चॅलेंजर्सची हवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धावांचा डोंगर रचण्यासाठी सज्ज असलेल्या फाफ डय़ु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल बाद करून बंगळुरूला 189 धावांत रोखणाऱ्या राजस्थानला विजयासाठी 7 धावा कमी पडल्या आणि बंगळुरूत रॉयल चॅलेंजर्सचीच हवा दिसली. पण सलग दोन सामन्यांत पराभूत होऊनही राजस्थानने स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मॅक्सवेलची वादळी खेळी विजयाचा शिल्पकार ठरली.

राजस्थानला विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी 6 चेंडूंत 20 धावांचे जबर आव्हान होते, पण रविचंद्रन अश्विनने हर्षल पटेलच्या पहिल्या तीन चेंडूंवर 4, 2, 4 अशा धावा काढत सामन्याचा थरार वाढवला. पण चौथ्या चेंडूवर अश्विन बाद झाला आणि बंगळुरूने सामन्यावर आपला ताबा मिळविला. शेवटच्या 2 चेंडूंत 10 धावा हव्या होत्या, पण पटेलने केवळ दोनच धावा दिल्या आणि बंगळुरूने 7 धावांनी विजय नोंदविला.

जैसवाल-पडिक्कलची यशस्वी भागी
एकाच धावेवर जोस बटलरची विकेट पडल्यानंतर राजस्थानच्या पोटात गोळा आला होता, पण यशस्वी जैसवाल आणि देवदत्त पडिक्कलने 11 षटकांत 98 धावांची भागी रचली आणि राजस्थानला विजयाच्या ट्रकवर आणले. पडिक्कलने 34 चेंडूंत 52 तर यशस्वीने 37 चेंडूंत 47 धावा काढल्या. ही जोडी फुटल्यानंतर राजस्थानला धक्के बसत गेले, पण ध्रुव जुरेलने 16 चेंडूंत 2-2 षटकार -चौकार खेचत राजस्थानचे आव्हान जिवंत ठेवले होते. तरीही त्याचे प्रयत्न कमीच पडले. हर्षल पटेलने 32 धावांत 3 विकेट घेत बंगळुरूला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, 12 षटकांत 128 धावा चोपून काढल्यानंतर बंगळुरू अडीचशेच्या आसपास मजल मारेल, ग्लेन मॅक्सवेल घणाघाती शतक ठोकेल असे सर्वांचे अंदाज होते, पण आयपीएलच्या अनपेक्षित थराराने सारे अंदाज चुकवले. शेवटच्या 8 षटकांत केवळ 61 धावाच काढता आल्या आणि 7 विकेटही पडल्या. राजस्थानच्या गोलंदाजांनी शेवटच्या आठ षटकांत अचूक मारा करत बंगळुरूला दोनशेसुद्धा होऊ दिले नाही.

डय़ु प्लेसिस- मॅक्सवेलचे वादळ
ट्रेंट बोल्टने कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर पायचीत केले आणि दुसऱ्या षटकात शाहबाज अहमदला 2 धावांवर बाद करीत सनसनाटी निर्माण केली. 2 बाद 12 नंतर मॅक्सवेल आणि फाफ डय़ु प्लेसिसचे वादळ घोंघावले. दोघांनी चौकार-षटकारांची बरसात करत 9 षटकांतच शतकी भागी रचली. पण 127 धावांची भागी केल्यानंतर फाफ दुर्दैवीरीत्या यशस्वी जैसवालच्या थेट चेंडूफेकीवर धावचीत झाला. फाफने 39 चेंडूंत 62 धावा केल्या होत्या. दोघांनी आपल्या भागीत 6 षटकार आणि 14 चौकार ठोकले.

भागी फुटताच डावही कोलमडला
जमलेली भागी फुटताच बंगळुरूचा डावही कोलमडला. फाफनंतर मॅक्सवेल शतक ठोकण्याची चिन्हे होती, पण तोसुद्धा बाद झाला. त्यानंतर बंगळुरूची मधली फळी आणि तळाचे फलंदाज काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे बंगळुरूला 9 बाद 189 धावाच करता आल्या. ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्माने प्रत्येकी दोन विकेट टिपले.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 20 षटकांत 9 बाद 189 (फाफ डय़ु प्लेसिस 62, ग्लेन मॅक्सवेल 77 ; ट्रेंट बोल्ट 4-0-41-2, संदीप शर्मा 4-0-49-2, रविचंद्रन अश्विन 4-0-36-1, युजवेंद्र चहल 4-0-28-1).

राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 6 बाद 182 (यशस्वी जैसवाल 47, देवदत्त पडिक्कल 52, संजू सॅमसन 22, ध्रुव जुरेल नाबाद 34, हर्षल पटेल 4-0-32-3, डेव्हिड विली 4-0-26-1).