
वर्ल्ड कपपाठोपाठ आयपीएलचा लिलावही ऑस्ट्रेलियाने जिंकला. आयपीएलच्या मिनी लिलावात जगज्जेते ऑस्ट्रेलियन्सच सर्वात भारी ठरले. मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने चक्क 24.75 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी करत त्याला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूचा मान दिला. आयपीएलच्या मालकांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना घेण्यासाठी इतकी चढाओढ होती की, अवघ्या पाच खेळाडूंसाठी तब्बल 67 कोटी रुपये खर्च केले.
समीर रिझवान, जॉन्सनला लॉटरी
उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातल्या 20 वर्षीय समीर रिझवानला अक्षरशः लॉटरी लागली. यूपी टी-20 लीग स्पर्धेत आपल्या फलंदाजीचा धमाका करणाऱया या समीरने सीएसकेच्या महेंद्र सिंग धोनीला आकर्षित केल्यामुळे त्याला 8.4 कोटी रुपयांच्या मोठया किमतीवर विकत घेतले आहे. मूळ किंमत 20 लाख असलेल्या समीरला इतकी प्रचंड किंमत लाभल्याचे साऱयांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या अननुभवी स्पेन्सर जॉन्सनसाठी गुजरात टायटन्सने दहा कोटींची रक्कम मोजली आहे. वेस्ट इंडीजच्या एक कोटी मूळ किंमत असलेल्या अल्झारी जोसेफला आरसीबीने 11.50 कोटींना खरेदी केले आहे. तसेच कुमार कुशाग्र या 20 लाखांच्या खेळाडूला दिल्लीने 7.2 कोटींनी खरेदी केले. 40 लाख मूळ पिंमत असलेल्या शाहरुख खान या नव्या दमाच्या खेळाडूसाठी गुजरात टायटन्सने 7.4 कोटी रुपये देण्याचे धाडस दाखवले.
ब्रुक, ठाकूरचा भाव घसरला
इंग्लंडच्या हॅरी ब्रुकला गेल्या मोसमात 13.25 कोटी इतकी मोठी किंमत लाभली होती, पण आज चक्क त्याच्या भावात घसरण झाली असून दिल्ली पॅपिटल्सने त्याला चार कोटींना खरेदी केले. त्याचप्रमाणे हिंदुस्थानच्या शार्दुल ठाकूरला 10.75 कोटी रुपये मिळाले होते. पण आज त्याच्यासाठी सीएसके चार कोटी इतकी किंमत मोजली. 2018 च्या आयपीएल लिलावात 11.4 कोटींनी विकला गेलेला जयदेव उनाडकट आज 1.6 कोटींना हैदराबादने आपल्या संघात घेतले.
ऑस्ट्रेलियन्सचाच बोलबाला
लिलाव सुरू होताच पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटींनी विकत घेत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरवला होता, पण काही वेळाने कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये मोजून आयपीएलमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. मग अननुभवी स्पेन्सर जॉन्सनसाठी 10 कोटी खर्च करताच साऱयांच्या भुवया उंचावल्या होत्या. झाय रिचर्डसन या नवोदित खेळाडूसाठीही दिल्ली पॅपिटल्सने पाच कोटी खर्च केले. वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत झळकलेल्या ट्रव्हिस हेडची मूळ किंमत 2 कोटी असूनही त्याला 6.8 कोटी इतकीच किंमत मिळाली.






























































