
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन सप्टेंबरमध्ये हिंदुस्थान दौऱ्यावर येणार असून, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. इराणने शुक्रवारी या दौऱ्याला अधिकृत दुजोरा दिला आहे. 2026 मध्ये हिंदुस्थानकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद असून, याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. इराण 2024 मध्ये ब्रिक्सचा पूर्ण सदस्य झाला आहे.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार पेझेश्कियन यांच्या हिंदुस्थान दौऱ्याचे महत्त्व पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढले आहे. हिंदुस्थान आणि इराणमधील संबंधांच्या दृष्टीने चाबहार बंदर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेझेश्कियन यांची भेट झाली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध तसेच पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली होती.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जूनमध्ये ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी हिंदुस्थानला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी हिंदुस्थान महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांत हिंदुस्थान आणि इराणमधील उच्चस्तरीय संपर्क वाढला आहे. जुलैमध्ये मोदी आणि पेझेश्कियन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. या चर्चेत पश्चिम आशियातील परिस्थिती आणि प्रादेशिक शांततेबाबत विचारविनिमय झाला. त्यामुळेच पेझेश्कियन यांचा आगामी हिंदुस्थान दौरा केवळ ब्रिक्स शिखर परिषदेसाठीची उपस्थिती न राहता, हिंदुस्थान-इराण संबंध, चाबहार बंदर, प्रादेशिक सुरक्षा आणि पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.



























































