इस्त्रोच्या जीसॅट 29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीहरीकोटा

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन म्हणजेच इस्रोतर्फे श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSAT – 29 हा 3,423 किलो वजनाचा संदेशवाहक उपग्रह बुधवारी संध्याकाळी 5 वाजून 8 मिनिटांनी यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला. हा इस्रोचा 33 वा संदेशवाहक उपग्रह आहे. देशातील या 67 व्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले. 2018 या वर्षातील इस्रोची 5 वी उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम आहे. इस्रोचा बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या GSLV MK 3 या प्रक्षेपकाचे हे दुसरे उड्डाण आहे. या प्रक्षेपकाचे वजन तब्बल 630 टन एवढे आहे. आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपैकी हा सर्वात जास्त वजनाचा उपग्रह आहे.GSAT – 29 चा कार्यकाल 10 वर्षांचा असून यामुळे इंटरनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

हिंदुस्थानी बनावटीच्या मॅक 3 रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. पृथ्वीपासून 36000 किलोमीटरवर भूस्थिर कक्षेत हा उपग्रह स्थापित करण्यात येणार आहे. रॉकेटमध्ये एस 200 हा जगातील दुसरा क्रमाकांचा मोठा बूस्टर वापरण्यात आला. या उपग्रहामुळे जम्मू क्शमीर, ईशान्य हिंदुस्थानातील डिजिटल सेवेला गती मिळणार आहे. देशातील दुर्गम भागात हायस्पीड डेटा पाठवण्यासही मदत होणार आहे. या क्षेत्रात इंटरनेटची गतीही वाढणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने नवीन अंतराळ तंत्रज्ञान विकसीत करण्यासह मदत मिळणार आहे. या उपग्रहात हाय रिझॉल्युशन कॅमेराही बसवण्यात आला आहे.