जगन्नाथ शंकर शेट उड्डाणपूल परिसराचे रूपडे पालटतेय! पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

मुलांना खेळण्याकरिता खेळणी व उद्यान फुलझाडे, खाबांवर व्हर्टिकल गार्डन, योग विभाग, हिरवळ आणि रोषणाई अशी कामे करून दादरच्या जगन्नाथ शंकर शेट उड्डाण पुलाखालील परिसर सुशोभित करण्यात येत आहे. शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांच्या पयत्नाने हे काम होत आहे. या ठिकाणी प्रस्तावित कचरा वर्गिकरण केंद्र पालिकेने रद्द केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील उड्डाण पुलाखाली पालिका सुशोभीकरण करत आहे. या उड्डाण पुलाची आठ भागात विभागणी करण्यात आली आहे. यातील दोन भागात राज्य परिवहन सेवा डेपो आहे. तर एका ठिकाणी कचरा वर्गिकरण केंद्र सुरू करण्यात येणार होते.

पाच भागांतील सुशोभीकरणाचे काम पूर्ण होऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी उर्वरीत भागाचेही सुशोभीकरण करण्याची मागणी केली. यानुसार पालिकेने हे कचरा वर्गिकरण केंद्र रद्द करून त्या ठिकाणीही सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आगामी काळात पुलाखालील खोदादाद सर्कलचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. या उपक्रमात हिंदमाता उड्डाण पुलाखाली भागात कुंपण घालण्याच्या कामाचाही समावेश करण्यात आला आहे.

असे होणार काम

सुशोभिकरण आणि विकास या कामात पाच भागात स्थापत्य कामे करण्यात येणार आहे. यामध्ये सुबक जाळीसह नवीन संरक्षक भिंत, अंतर्गत पदपथ, विविध प्रकारची बैठक व्यवस्था, स्कच्छतागृहाची दुरुस्ती, प्रवेशद्वाराची कामे, उद्यानासाठी मातीची भरणी, ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा, योगा विभाग विद्युत खांब दिवे अशी कामे केली जाणार आहे.

पाच भागांचे सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेला 4 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च येणार होता. मात्र वाढीव कामामुळे या खर्चात 3 कोटी 75 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. आता हा खर्च 8 कोटी 9 लाखांवर गेला आहे. या वाढीव खर्चासह कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या