
पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर देशविदेशातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिर त्यातील खजिन्याच्या मोजणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. येथील रत्नांचा खजिन्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. मंदिराच्या खजिन्याची मोजणी सुरू झाली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती विविध टप्प्यांमध्ये केली जात आहे. या खजिन्याच्या मोजणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या मंदिराबाबतची अनेक रहस्ये पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचा उलगडा विज्ञानालाही अद्याप करता आलेला नाही.
पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर चार धामांपैकी एक मानले जाते आणि भव्य रथयात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे. आख्यायिकेनुसार, भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळाल्यानंतर राजा इंद्रद्युम्नाने हे मंदिर बांधले. असे म्हटले जाते की, भगवानांनी त्याला स्वप्नात नील माधवाला शोधण्याची आज्ञा दिली होती.
एका आख्यायिकेनुसार, पांडव स्वर्गारोहणाला निघाले, तेव्हा सप्तऋषींनी त्यांना मोक्षप्राप्तीसाठी चार धामांना भेट देण्याचा सल्ला दिला. पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे या पवित्र स्थळांपैकी एक आहे. तेव्हापासून पुरी जगन्नाथ मंदिराशी संबंधित अनेक रहस्ये आहेत. मात्र, त्यातील ५ रहस्ये नेहमी चर्चेत असतात. त्यातील एक म्हणजे मंदिरावर नेहमी एक लाल झेंडा फडकत असतो. हे एक सामान्य दृश्य वाटू शकते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो (ध्वज) वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. हे प्रत्येक वेळी घडते. बरेच लोक याला देवाचा संकेत मानतात, जणू काही तो पूर्णपणे समजण्यास कठीण असा काहीतरी संदेश देत आहे. याच्याशी एक विशेष परंपरा देखील जोडलेली आहे. दररोज, एक पुजारी कोणत्याही सुरक्षेविना सुमारे २०० फूट उंच मंदिरावर चढतो आणि ध्वज बदलतो. असे मानले जाते की, जर कोणत्याही दिवशी या परंपरेचे पालन केले नाही, तर मंदिर अनेक वर्षे बंद राहू शकते.
जगन्नाथ मंदिर समुद्रापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत पाऊल ठेवताच लाटांचा आवाज पूर्णपणे नाहीसा होतो. बाहेर पाऊल ठेवताच तोच आवाज पुन्हा ऐकू येतो. म्हणूनच लोक म्हणतात की हे केवळ एक मंदिर नाही, तर एक अनोखा अनुभव आहे. असे मानले जाते की मंदिराच्या रक्षणासाठी भगवान हनुमानाला स्थापित केले होते आणि त्यांनी समुद्राचा आवाज शांत केला, जेणेकरून भगवान जगन्नाथांना शांतपणे विश्रांती घेता येईल.
देवाचा प्रसाद दररोज एकावर एक रचलेल्या सात मातीच्या भांड्यांमध्ये शिजवला जातो. साधारणपणे, खालचे भांड्यातील अन्न आधी शिजते पण येथे याच्या उलट होते. सर्वात वरचे भांड्यातील पदार्थ आधी तयार होते. इतकेच नाही, तर दर्शनासाठी कितीही लोक आले तरी प्रसाद कधीही संपत नाही किंवा शिल्लक राहत नाही. दररोज अगदी तंतोतंत प्रमाणात प्रसाद तयार होतो.
मंदिराची रचना अशी आहे की दिवसाच्या कोणत्याही वेळी त्याची सावली दिसत नाही. ही गोष्ट आजही लोकांना आश्चर्यचकित करते. जगन्नाथ मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती. बहुतेक मंदिरांमध्ये देवतांच्या मूर्ती दगड किंवा धातूच्या बनवलेल्या असतात, तर येथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत. आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे, ‘नबकलेवर’ नावाच्या एका विशेष आणि गुप्त प्रक्रियेद्वारे या मूर्ती दर १२ ते १९ वर्षांनी बदलल्या जातात. असा विश्वास आहे की, या प्रक्रियेदरम्यान ‘ब्रह्म पदार्थ’ नावाचा एक रहस्यमय घटक जुन्या मूर्तीमधून नवीन मूर्तीमध्ये स्थानांतरित होतो. ही प्रक्रिया केवळ काही निवडक पुजारीच पाहू शकतात; बाकी सर्व काही एक रहस्यच आहे. त्यामुळे जगन्नाथ मंदिर नेहमी चर्चेत असते.
























































