
सामना प्रतिनिधी। बदनापूर
जालना जिल्ह्यातील व बदनापूर तालुक्यात मागील चार ते पाच वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेने पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे मोसंबी-डाळींबी फळबागांसाठी प्रसिध्द असलेला बदनापूर तालुक्यातील बागा नष्ट होत चालल्या असून या वर्षीच्या दुष्काळाने तर परिसर बेचिराख झाला आहे. अनेक तरुण शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली .
बदनापूर तालुका मोंसबी बागांसाठी प्रसिध्द होता. परंतु 2013 साली पडलेल्या दुष्काळात तालुक्यातील ७५ टक्के बागा शेतकऱ्यांना पाण्याअभावी तोडाव्या लागल्या. हाता तोंडाशी आलेला घासच या वेळी नष्ट झाला. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा पदरमोड करून विविध फळबागा लावल्या. यात डाळींबी, पपई, पेरू, आंबा, आवळा आदींचा समावेश होता. परंतु पुन्हा मागील दोन वर्षांपासून निसर्गाने अवकृपा केली आणि पावसाने वक्रदृष्टी केली त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून वाढवलेल्या या बागा, त्या साठी केलेले शेततळे, तयार केलेले ठिबक सिंचनाची व्यवस्थेचा खर्च यंदा मात्र वाया जाणार असून यंदाही या बागा पाण्याअभावी सुकत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे फळबागा फुलवलेल्या शेतकऱ्याची झोप उडाली आहे. भीषण दुष्काळात सर्व काही मिळेल बागा जगवण्यासाठी पाणी कोठून आणावे, एकदा फळबागा उद्वस्त झाल्या तर पुन्हा पदरात काय या चिंतेने बदनापूर तालुक्यातील शेतकरी भयभीत झाला आहे. बदनापूर तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या दुष्टचक्राने शेतकऱ्यांना कंगाल केले आहे. परंपरागत शेती तोट्यात आली आहे.
तालुकाभरात तब्बल तीन हजार हेक्टरपेक्षा जास्त भागात फळबागा फुलवण्यात आल्या. यात डाळींब,पपई, द्राक्षे, सीताफळ, जाब, केशर आंबा, ड्रॅगन, मोसंबी, लिंब या फळांचा सामावेश आहे. कापूस, ऊस, तूर, बाजरी, ज्वारी या पारंपरिक आणि नगदी पिकापेक्षा फळबाग लागवडीवर भर दिला गेला. श्रम, पाणी आणि लागवड खर्च कमी उत्पादनाची जास्त हमी हा मंत्र लक्षात ठेवूनच शेतकरी कामाला लागला. मात्र या भीषण दुष्काळाने फुललेल्या फळबागा उद्वस्त करायला सुरुवात केली आहे. शासनाने फळबागांना विमा संरक्षण दिलेले आहे. परंतु राष्ट्रीयकृत बॅका व विमा कंपन्यांत समन्व्य नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही पडत नसल्याचेच चित्र आहे. या वर्षी वातावरणातील बदलामुळे पिकावर रोगराई वाढली आणि आता पाणीच नसल्यामुळे फळबागा कशा जगवाव्यात हा यक्ष प्रश्न समोर उभा राहिला आहे.






























































