
जालना जिल्ह्यातील संभाजीनगर-जालना महामार्गावरील बदनापूर शहरालगत असलेल्या दुधना नदीच्या पुलावर आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. झोपेच्या धुंदीत जालन्याहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या आयशर चालकाचा टेम्पो पुलावरून कोसळल्याने मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
नांदेडहून मुंबईकडे बियरच्या रिकाम्या बॉटल घेऊन निघालेल्या आयशर चालक चांद बेग कडू बेग (वय – 46 रा. नायगाव- सावंगी जि. संभाजीनगर) यांचा दुधना नदीवरील पुलावर आल्यानंतर अचानक डोळा लागल्याने अपघात झाला. आयशर ट्रक दोन्ही पुलाच्या मध्यभागी असलेल्या अरुंद जागेत कोसळला आणि चालकासह त्याचा मुलगा वाहेद बेग हे दोघे मध्येच अडकले. सदर घटना बदनापूर शहरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. मात्र अरुंद जागा असल्याने लवकर जखमींना काढणे शक्य झाले नाही.

सदरील माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी व हायड्र आणून सदरील अपघातग्रस्त वाहन उचलण्यात आले. आशयर पूलाच्या मध्येभागी दोन्ही भिंतीत आडकल्याने लवकर निघू शकला नाही. सकाळी 11 वाजेनंतर अपघातग्रस्त वाहन काढण्यात यश मिळाले. वाहनात अडकलेल्या दोघांपैकी चालक चांद बेग यांचा अपघातात दबून मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा वाहेद बेग गंभीर जखमी झाला.



























































