जांबूतला शेततळ्यात पडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू, मुलाच्या आईला वाचविण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्याच्या बेट भागातील जांबूत येथे शेततळ्यात पडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत रूषिकेश दिगंबर झिंजाड यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. तर मुलगा राजवंश व पती सत्यवान यांना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारलेल्या आईला वाचविण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

जांबूत (पंचतळे) येथील बेल्हा-जेजुरी राज्य मार्गालगत शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र आहे.या ठिकाणी कुटुंबासह ते राहतात. रविवार दि.30 ला संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सत्यवान शिवाजी गाजरे (25),पत्नी स्नेहल हे आपल्या राजवंश या दीड वर्षे वयाच्या लहान मुलासह शेतात होते. त्यांची नजरचुकवत खेळताना राजवंश हा स्विमिंग टंँकमध्ये (शेततळ्यात) पडला असता वडील सत्यवान शिवाजी गाजरे याने चिमुकल्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने तेदेखील बुडू लागले. दोघांना बुडत असल्याचे पाहून सत्यवान यांची पत्नी स्नेहल हिने पती व मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र तीही पाण्यात बुडू लागल्याने तिच्या ओरडण्याच्या आवाजाने किरण गाजरे, प्रविण गाजरे व इतरांनी घटनास्थळी धाव घेत आणि बुडत असलेल्या स्नेहल हिला बाहेर काढले. तसेच राजवंश व सत्यवान यांनाही बाहेर काढून आळेफाटा येथे उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तपासून उपचारापूर्वीच दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेची माहिती कळताच जांबूत सह परिसरात शोककळा पसरली असून पिता पुत्राच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.