जामखेडमधील दिघोळ गाव कोरोनाच्या विळख्यात, एकट्या गावात 300 हून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

तालुक्यात गेल्या महिनाभरात 509 कोरोनाबाधित आढळले असून, त्यातील 200 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 300 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 28 मार्चअखेर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील दिघोळ हे गाव कोरोनाचे हॉट स्पॉट बनले असून, या गावातील रुग्णसंख्या साडेतीनशेवर गेली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, प्रत्येक कुटुंबाच्या कोरोना चाचणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत गावात दीडशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

दिघोळ हे कोरोनाचे हॉट स्पॉट बनले असून, त्या गावातील रुग्णसंख्या 350 वर गेली आहे. त्यामुळे प्रशासन कोरोना रोखण्यात शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दिघोळ गावातील प्रत्येक कुटुंबाची कोरोना चाचणी घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 519 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 50 रुग्ण आढळले आहेत, तर सोमवारी 50 व मंगळवारी 56 रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण गावाची चाचणी करण्यासाठी आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन हे दिघोळ येथे ठाण मांडून बसले आहे.

दरम्यान, तालुक्यातील 15 गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले आहेत. दिघोळसह पाडळी, जामखेड शहर, कुसडगाव, खर्डा, फक्राबाद, जवळा, बोर्ले, पारेवाडी, पिंपरखेड, सारोळा, सोनेगाव, शिऊर, लेहेनेवाडी, जवळा आदी गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातील रुग्णसंख्या 500च्या वर गेली आहे.

21 दुकानांवर 7 दिवस बंदची कार्यवाही

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी जामखेड शहरातील 14, तर खर्डा येथील 7 अशा एकूण 21 दुकानांवर कोरोनाचे नियम न पाळल्याने कार्यवाही करण्यात आली आहे.

तालुक्यात 3 हजार 850 जणांचे लसीकरण

तालुक्यातील 60 वयोगटातील 1681 नागरिकांना, तर 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना 724 व फ्रंटलाइन कर्मचारी आरोग्य व अंगणवाडी सेविका अशा एकूण 719 पैकी 633 कर्मचाऱयांनी लस घेतली आहे, तर तहसील, पंचायत समिती, पोलीस, नगरपरिषद अशा एकूण 812 अधिकाऱयांना लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्यात 23 मार्चपर्यंत 3850 अधिकारी व नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.