जामखेडमध्ये भाजपला धक्का, तीन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

bjp-logo

कर्जत नगरपंचायतीच्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असताना जामखेड नगरपरिषदेच्या तीन नगरसेवकांनीही कमळ सोडून घड्याळ बांधले आहे. नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

जामखेड येथील विश्रामगृहामध्ये प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, सूर्यकांत मोरे, दयानंद कथले, सतिष चव्हाण, बापूराव शिंदे, अमोल जावळे, पिंटू काळे, अशोक धेंडे, दादासाहेब भोरे, अमित जाधव, असिफ शेख यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ या तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी अकरा नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपाच्या ताब्यात असलेली जामखेड नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता.

चार वर्षांपूर्वी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 11, शिवसेना 4,भाजपा 3, मनसे 1, दोन अपक्ष असे 21 नगरसेवक होते त्यावेळी सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली नंतर सुरेश धस भाजपात गेले तेव्हा अनेक नगरसेवकांनी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला व जवळपास सर्वच नगरसेवकांनी भाजपाचा रस्ता धरला आता राम शिंदे पराभूत झाले. आमदार रोहित पवार विजयी झाले तेव्हा लगेच भाजपात दाखल झालेले नगरसेवक परत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आले आहेत. आता फक्त दोन नगरसेवक भाजपमध्ये राहिलेले आहेत. तीन नगरसेवकांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
रोहित पवार हेच जामखेड परिसराचा खरा विकास करू शकतात म्हणून त्यांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला आहे. यामुळे भाजपाला गळती लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या