
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी विधानसभा बरखास्त केल्यानंतर आता आरोप- प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. गुरुवारी सकाळी भाजप नेते राम माधव यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि राम माधव यांच्यातील ट्विटर वॉरला सुरुवात झाली. सरकारस्थापनेसाठी एकत्र येण्याचा पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचा निर्णय पाकिस्तान समर्थित असल्याचा आरोप राम माधव यांनी केला. आपण केलेले आरोप सिद्ध करा किंवा माफी मागा अशा शब्दांत उमर यांनी राम माधव यांना आव्हान दिले. त्यानंतर राम माधव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.
राम माधव आणि उमर अब्दुल्ला यांच्यात गुरुवारी सकाळपासूनच टि्वटर वॉरला सुरुवात झाली होती. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सने गेल्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. हा निर्णयही त्यांनी पाकिस्तानच्या आदेशानुसार घेतला होता असा आरोपही माधव यांनी केला. राज्यात सरकार बनवण्यासाठी आता सीमेपलीकडून आलेल्या आदेशानुसार त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असावा असेही माधव म्हणाले. राज्यातील अशा परिस्थितीमुळे राज्यपालांना विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचेही ते म्हणाले.
राम माधव यांच्या या आरोपांवर उमर यांनी पलटवार केला. मी तुम्हांला आव्हान देतो की, तुम्ही केलेले आरोप सिद्ध करून दाखवा. तुमच्याकडे रॉ, एनआयए, सीबीआय आहे. याबाबतचा तपास करून आरोप सिद्ध करून दाखवा किंवा माफी मागा असे आव्हान त्यांनी ट्विटरवर माधव दिले. आपण नॅशनल कॉन्फरन्सच्या देशभक्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. मात्र, पीडीपी आणि एनसीमध्ये अचानक निर्माण झालेली जवळीक साशंकता निर्माण करणारी आहे.असे माधव यांनी प्रत्युत्तर दिले. आपण याबाबत कोणताही प्रतिवाद करू नये, पाकिस्तानच्या इशाऱ्यानुसार आम्ही काम करतो असा आरोप तुम्ही केला आहे तर तो सिद्ध करून दाखवा, असे आव्हान उमर यांनी दिले.त्यानंतर आपण वक्तव्य मागे घेत असल्याचे राम माधव यांनी स्पष्ट केले. हे वक्तव्य राजकीय असून त्यात व्यक्तीगत आरोप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
























































