कणकवलीत जनता कर्फ्यूला नागरिकांचा स्वंयस्फूर्तीने प्रतिसाद

कणकवली,वागदे,कलमठ, जाणवली,हळवल यासह तालुक्यातील काही गावांमध्ये रविवारपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कणकवलीत जनता कर्फ्युचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले होते. त्याला कणकवलीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यामुळे कणकवली शहरात शुकशुकाट पसरला आहे. कणकवलीसह जवळच्या गावमधील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवत व्यवहार बंद ठेवले आहेत.

सकाळच्या वेळी दूध व वृत्तपत्र विक्री दोन तास सुरू होती. या जनता कर्फ्यूमध्ये नागरिक स्वतःहून सहभागी झाले आहेत. रिक्षा संघटनानीही वाहतूक बंद ठेवल्याने बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी वाहतुक सुरु असली तरी फारसे प्रवाशी नव्हते. शहरातील जनतेच्या सुरक्षेसाठी नागरिक, व्यापारी व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. या आवाहनाला रविवारी जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी शासकीय कार्यालये बंद आहेत. तसेच सुटीचा दिवस असल्याने शहरात शुकशुकाट आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूचा पहिला दिवस यशस्वी ठरला आहे. पोलिसांनी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पटवर्धन चौक येथे बंदोबस्त ठेवला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कणकवली, जाणवली,कलमठ,वागदेत पोलीस पेट्रोलिग करत आहेत.पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी व अन्य पोलीस अधिकारी जनता कर्फ्यूच्या निमित्ताने सतर्क आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या