लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास जनता दलाचा सरकारला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यभरात कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास त्याला पाठिंबा देण्याची भूमिका जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाने घेतली आहे. मात्र तत्पूर्वी गरजू आणि गरीब कुटुंबाना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यात कोरोनाचा झपाटय़ाने प्रसार होत आहे. त्यामुळे ही वाढ रोखण्यासाठी राज्य सरकार किमान दोन ते तीन आठवडय़ांचा लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता दिसत आहे. परिस्थिती खरोखरच गंभीर आहे. दररोज 50 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून उचलण्यात येत असलेले कठोर उपाय हे अपरिहार्य असून जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचा त्याला पाठिंबाच राहील.

मात्र लॉकडाऊनसारख्या कठोर निर्बधांची किंमत अखेर सामान्य माणसाला मोजावी लागते. त्याची रोजीरोटी कमावण्याचे, उदरनिर्वाहाचे मार्ग बंद होतात आणि कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येते याचाही विचार राज्यकर्त्यांनी करणे आवश्यक असल्याने त्यांना मदत करण्याची मागणी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे व अन्य नेत्यांनी केली आहे.