जतमध्ये गर्भवती महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. जत तालुक्यातील सिंदूर येथे ही घटना घडली आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत, गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे जत ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लक्ष्मी धानेशा माडग्याळ (वय 23), मुलगी दिव्या (वय 2 वर्षे) आणि मुलगा श्रीशैल (वय 1 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

लक्ष्मीचा विवाह मामासोबत झाला होता. विवाहानंतर धानेशा याच्यासोबत चार वर्षांपूर्वी तिने पळून जाऊन लग्न केले होते. लक्ष्मी व धानेशा या दोघांनी पळून जाऊन लग्न केल्याने लक्ष्मीच्या माहेरची मंडळी नाराज होती. लक्ष्मीच्या संपर्कात माहेरचे कोणीच नव्हते. लक्ष्मी व धानेशा या दोघांनी सिंदूर येथे आपला संसार थाटला. त्यांना दोन वर्षांची दिव्या, तर एक वर्षाचा श्रीशैल हा मुलगा होता. लक्ष्मी ही तीन महिन्यांची गरोदर होती. रविवारी पती धानेशा व सासरा शेतात औषधफवारणीसाठी गेले होते, तर सासू वैरण आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी लक्ष्मी हिने दिव्या व श्रीशैल या दोन्ही चिमुकल्यांना सोबत घेत शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या लक्ष्मी व तिच्या दोन्ही मुलांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी तिघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मी हिच्या माहेरचे लोक जत ग्रामीण रुग्णालयात जमा झाले. त्यांनी ही आत्महत्या नसून,घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा लक्ष्मीच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.