
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. सरकारने सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेऊ नये अशी मागणी त्यांनी सरकारकडे केले आहे.
महाराष्ट्र शासन, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 पर्यंत वाढवण्याच्या विचाराधीन आहे. मात्र आमचा निर्णयाला विरोध आहे तसेच सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली जाऊ नये अशी आमची मागणी आहे. शासनाने अशाप्रकारे सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवल्यास आगामी दोन वर्षात शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण नगण्य होईल. पर्यायाने शासन सेवेतील पदे रिक्त होणार नाहीत व नवीन बेरोजगार होतकरू उमेदवारांना शासन सेवेत प्रवेश करण्याची संधी मिळणार नाही तसेच ज्यांचे शासन सेवेत प्रवेशाची अंतिम 2 संधी असतील असे उमेदवार संधी उपलब्ध न झाल्याने वयोमर्यादेमुळे अपात्र होतील आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढेल अशी चिंता जयंत पाटील आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
या सर्वच गोष्टींमुळे राज्यातील तरुण वर्गात निराशा निर्माण होऊन त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होईल व मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने आम्ही दिलेल्या पत्राची दखल घेऊन सेवानिवृत्ती वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे.





























































