
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये भाग घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. मी पुन्हा येणार म्हटले की येतोच, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार करत त्यांना टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन ते काय करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो, या शब्दांत निपाणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावर जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे.
जे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे, असे म्हणत असतील. त्यांचा भाजपने फौजदाराचा हवालदार केला आहे. आता त्यांनी आमची मापे काढू नयेत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. आमचा पक्ष साडेतीन जिल्ह्याचा नाही. शरद पवार यांच्या झंझावातात 2024 ला हा पक्ष महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष होणार आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला एका वाक्यात उत्तर दिले. आता मी चाललोय निपाणीला, त्यामुळे कोण पार्सल आहे, आणि कोण किती वस्ताद आहे, या सगळ्या खोलात तिथे बोलायचे, इथे नाही, असे म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना निपाणीत जाऊनच उत्तर देऊ, असे स्पष्ट केले.
































































