जयसूर्याने घेतली ऑस्ट्रेलियाची फिरकी, श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटीत डावाने ऐतिहासिक विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदार्पणवीर युवा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने ऑस्ट्रेलियाची फिरकी घेत श्रीलंकेला दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात एक डाव 39 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. श्रीलंकेने कारकीर्दीत प्रथमच ऑस्ट्रेलियावर डावाने विजय साकारून ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले. सामनावीर ठरलेल्या जयसूर्याने दोन्ही डावांत 6-6 फलंदाज बाद केले. द्विशतकवीर दिनेश चंडीमल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

राजकीय आणि आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी हा क्रिकेटमधील विजय दिलासा देणारा ठरला. देशात महागाईचा आगडोंब उसळलेला असताना अशा प्रतिकूल परिस्थितीत तिथल्या क्रिकेटपटूंनी देशवासीयांसाठी आनंदाचे काही क्षण उपलब्ध करून दिले आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 364 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने दिनेश चंडीमलच्या (नाबाद 206) द्विशतकाच्या जोरावर 554 धावा केल्या. पहिल्या डावात 190 धावांची आघाडी मिळालेल्या श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला दुसऱया डावात 151 धावांवर गुंडाळून संस्मरणीय विजय मिळविला. पहिल्या डावात 6 बळी टिपणाऱया प्रभात जयसूर्याने दुसऱया डावातही 59 धावांत 6 बळी घेतले.

जयसूर्याने जयविक्रमाचा विक्रम मोडला

प्रभात जयसूर्या हा पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक बळी टिपणारा श्रीलंकेचा गोलंदाज ठरला. त्याने प्रवीण जयविक्रमाचा विक्रम मोडला. जयविक्रमाने 2020-21 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 11 गडी बाद केले होते. या प्रकरणातील विश्वविक्रम हिंदुस्थानच्या नरेंद्र हिरवानी आणि ऑस्ट्रेलियाच्या बॉब मॅसी यांच्या नावावर आहे. या दोघांनी आपापल्या पदार्पणाच्या कसोटीत 16-16 बळी टिपले होते.