दहा वर्षांत विरोधी पक्षांचे 740 आमदार-खासदार भाजपात; झारखंड मुक्ती मोर्चाने आकडेवारीच मांडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडी, सीबीआयची भीती दाखवून तसेच भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांनाच पक्षात प्रवेश देण्याचे धोरण भाजपाने अवलंबल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. केवळ दबावापोटी गेल्या 10 वर्षांत तब्बल 740 खासदार-आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याचा गंभीर आरोप झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी केला. ते रांची येथे वार्ताहारांशी बोलत होते.

2014 ते 2024 या काळात देशभरात अनेक अजब गोष्टी घडल्याचे दिसून आल्याचा दावा भट्टाचार्य यांनी केला. काय खावे, परिधान करावे, अभ्यास करावा, अगदी काय ऐकावे यासंदर्भातही सूचना आदेश देण्यात आल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले. विरोधी पक्षात असणारे सगळे भ्रष्ट आणि भाजपामध्ये असणारे सगळे धुतल्या तांदळासारखे, असे सत्ताधारी समजतात. जे सरकारच्या धोरणांना विरोध करतात त्यांना राष्ट्रविरोधी ठरवले जाते, असा आरोपही भट्टाचार्य यांनी केला. दरम्यान, अलिकडेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानतंर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. चव्हाण यांच्यावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आरोप केले होते.

भाजपाची वृत्ती अहंकारी धोरणाची
भाजपाची वृत्तीच अहंकारी धोरण राबवण्याची असल्याचा आरोप भट्टाचार्य यांनी केला. झारखंड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. आदिवासींचा सन्मान ही प्राधान्याची बाब आहे. पण, त्यांना आदिवासी मुख्यमंत्री नको आहे. जर आदिवासी मुख्यमंत्री झालाच तर त्याची तुरुंगात रवानगी केली जाते, असा आरोपही त्यांनी केला.

भ्रष्टाचाराचे आरोप असणारेच नंतर आवडते झाले
गेल्या 10 वर्षांत भाजपामध्ये प्रवेश करणारे सर्वाधिक खासदार आणि आमदार काँग्रेसमधले होते, या सगळ्यांवर भाजपाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तेच लोक आता त्यांचे आवडते झाले, अशा शब्दांत भट्टाचार्य यांनी भाजपावर तोफ डागली.