
>> गणेश आचवल
सध्या सोनी मराठीवर ‘तुमची मुलगी काय करते?’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सावनी मिरजकर ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे जुई भागवत. जुईला लहानपणापासूनच वक्तृत्व स्पर्धा, अभिनय, नृत्य, संगीत या सगळय़ाची आवड होती. ती सरस्वती मंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी. तिची आई दीप्ती भागवत ही एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आहे हे आपण जाणतोच. लहानपणाचा एक गमतीदार किस्सा जुईने सांगितला. ती म्हणाली, माझी आई ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत भूमिका करत होती. तेव्हा काही वेळा मी आईबरोबर शूटिंगला जायचे. मी तेव्हा तिसरी-चौथीत असेन. मी एकदा सेटवर असताना कोणाला तरी म्हटले होते की, मला पण इथे काहीतरी रोल द्या ना आणि योगायोग हा की, त्याच मालिकेत मला लहानपणीच्या येसूबाई साकारण्याची संधी मिळाली.
त्यानंतर जुईने विविध मालिकांत बालकलाकार म्हणून काम केले. नेहरू सेंटरच्या संगीत महोत्सवात सादर केलेल्या ‘संगीत बैजूलीला’ या नाटकातदेखील तिची भूमिका होती. दहावीनंतर जुईने साठय़े कॉलेजला कला शाखेत प्रवेश घेतला. साठय़े कॉलेजमधील ‘नाटय़पर्व’ या संस्थेतून तिला खूप काही शिकता आले. एकांकिका स्पर्धांमध्ये तिचा सहभाग होता.
जुई म्हणते, ‘कॉलेजमध्ये असताना एकांकिका किंवा एकंदरच ज्या नाटय़विषयक उपक्रमातून आपण सहभागी होतो, तेव्हा आपण खूप काही शिकत असतो. एकांकिका, नाटक ही एक प्रोसेस आहे. त्यात अभिनयाप्रमाणे प्रकाशयोजना, बॅकस्टेज या सर्व गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हेसुद्धा मला शिकता आले आणि ज्यावेळी साठय़े कॉलेजने ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणून पुरस्कार दिला, तो आनंदाचा क्षण होता.’
बारावीनंतर जुईने रुईया कॉलेजला प्रवेश घेतला. रुईयात असतानाच काही प्रायोगिक नाटकातसुद्धा तिने काम केले. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिव्हलमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिऍलिटी शोमध्ये ती तिला ‘मोस्ट एक्स्प्रेसिव्ह फेस’ हा पुरस्कारदेखील मिळाला होता. ‘तुमची मुलगी काय करते?’मधील ‘सावनी मिरजकर’ ही भूमिका जुईच्या आयुष्यातील एक वेगळे वळण आहे. आपल्या या यशात कॉलेजच्या दिवसांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे ती आवर्जून सांगते.




























































