
अनंत सोनवणे,[email protected]
बांधवगडावरची कोरीव लेणी, शेषशायी विष्णूची मूर्ती वगैरे पाहायची का?’’ गाईडच्या या प्रश्नाला आमच्या संपूर्ण टीमनं एका सुरात उत्तर दिलं, ‘‘नाही, आम्हाला फक्त जंगल पाहायचंय!’’ क्षणभर विचार करून गाईड म्हणाला, ‘‘मग तर तुम्ही तिथं जायलाच हवं. जंगलाचं ते रूप तुम्हाला दुसरीकडे नाही पाहायला मिळणार. भरोसा रखो!’’ आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि खरोखरच त्यानं आम्हाला एका वेगळ्या विश्वात नेलं. टेकडीवरच्या त्या खडकाळ, वळणावळणाच्या रस्त्यानं आमचीच एक जिप्सी चालली होती. सभोवार गूढगंभीर घनगर्द जंगल. मध्येच सांबरानं धोक्याचा इशारा दिला. ड्रायव्हरनं गाडी जागीच थांबवली. साऱयांनी कान टवकारले. संपूर्ण शांतता. पुन्हा एकदा सांबराचा कॉल. मग एकामागोमाग एक ठराविक अंतराने आणखी काही कॉल्स येत राहिले, पण ते सारे आमच्यापासून दूर जाणारे होते. म्हणजे तो वाघ किंवा बिबटय़ा चालत होता आणि आमच्या विरुद्ध दिशेला जात होता. आमची आणखी एक संधी हुकली होती. कोंडलेला श्वास मोकळा झाला आणि आम्ही पुढे निघालो. टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो आणि पुन्हा निःशब्द, निस्तब्ध झालो. इथून भोवतालचा सारा परिसर नजरेच्या टप्प्यात येत होता. चारही बाजूंनी छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ा, गर्द हिरवाई, त्यातून ठळकपणे डोकावणारे मोठाले कातळ आणि त्या कातळांच्या कुशीतल्या नैसर्गिक घळी. वन्य प्राण्यांसाठी अत्यंत सुरक्षित निवारा. असं वाटत होतं, जणू कोणत्याही क्षणी त्यातल्या एखाद्या घळीतून एखादा वाघ, बिबटय़ा किंवा अस्वल प्रकट होईल! बराच वेळ आम्ही तो निसर्ग, गूढता, शांतता पिऊन घेत राहिलो.

मध्य प्रदेशातल्या विंध्य पर्वतरांगेत हे बांधवगड नावाचं नितांतसुंदर जंगल आहे. हे जंगल पूर्वी बांधवगडच्या रेवा राजांचं शिकारवन होतं. स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झालं तरी जंगल राजांकडेच राहिलं. बेसुमार चोरटी शिकार, वृक्षतोड सुरू राहिली. पहिला पांढरा वाघही बांधवगडच्याच जंगलात सापडला. अखेर 1968 साली बांधवगडचं जंगल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झालं. पुढे 1994 मध्ये इथं व्याघ्र प्रकल्पही स्थापन झाला.
इतर कुठल्याही राष्ट्रीय उद्यानात तुम्हाला एखादा वाघ दिसला तर तुम्ही नशीबवान ठरता. मात्र बांधवगड राष्ट्रीय उद्यानात तुम्हाला किमान एक वाघ दिसला नाही, तर तुम्ही कमनशिबी ठरता असं म्हटलं जातं. कारण वाघांची सर्वाधिक घनता असलेलं जंगल म्हणून बांधवगडची ओळख आहे. आता हत्ती आणि पर्यटक जिप्सींवर धावून जाणारा चार्जर नावाचा ताकदवान नर आणि त्याची सीता नावाची मादी ही जोडी हिंदुस्थानातल्या वाघांच्या इतिहासात अजरामर झालीय. आज बांधवगडमध्ये जे वाघ आहेत ते या चार्जर-सीताच्याच वंशावळीतले आहेत. बामेरा, मुकुंदा, राजबेहरा, स्पॉटी, शर्मिली इत्यादी नावांची ते ओळखले जातात.

या जंगलात बिबटय़ांची संख्याही चांगली आहे. लंकाधिपती रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परत जाताना श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेनं बांधवगडावर काही काळ निवास केला. श्रीरामानं हा गड लक्ष्मणाला भेट दिला. आता या गडाचे केवळ भग्नावशेष उरलेत, पण त्या सभोवतालचं जंगल आजही अतिश्रीमंत आहे.
बांधवगड राष्ट्रीय उद्यान
प्रमुख आकर्षण – वाघ
जिल्हा – उमारिया
राज्य – मध्य प्रदेश
क्षेत्रफळ – 820 चौ.कि.मी.
निर्मिती – 1968
जवळचे रेल्वे स्थानक – कटनी (40 कि.मी.)
जवळचे विमानतळ – जबलपूर (200 कि.मी.)
निवास व्यवस्था –खासगी हॉटेल्स व रिसॉर्टस्
योग्य हंगाम – जानेवारी ते मे
सुट्टीचा काळ – जुलै ते ऑक्टोबर
साप्ताहिक सुट्टी – नाही
























































