
अनंत सोनवणे
अरुणाचल प्रदेशातील पाखुई अरण्य… विविध पक्ष्यांसोबत हे ओळखलं जातं. धनेश पक्ष्यांसाठी…
पश्चिम घाटाप्रमाणेच हिंदुस्थानचा जैव विविधतेचा आणखी एक खजिना म्हणजे अरुणाचल प्रदेश. आजही इथली 60 ते 70 टक्के जमीन जंगलांनी व्यापलेली आहे. हिंदुस्थानात सापडणाऱया फुलणाऱया झाडांच्या प्रजातींपैकी 50 टक्के प्रजाती इथं आढळतात. पक्ष्यांच्या सुमारे 600, तर सस्तन प्राण्यांच्या 100 हून अधिक प्रजाती इथं पाहायला मिळतात. अनेक दुर्मिळ वन्य जीव इथं सुखेनैव नांदतात. अशा या समृद्ध अरुणाचलचा मुकुटमणी म्हणजे पाके वन्य जीव अभयारण्य!
पाके किंवा पाखुई नावानं ओळखलं जाणारं हे जंगल 2002 पासून व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट झालं. समुद्रसपाटीपासून 100 ते 2000 हजार मीटर उंचीपर्यंत पसरलेलं हे जंगल वन्य जीवांचा एक अति विस्तीर्ण आणि सलग अधिवास आहे. छोटे-मोठे डोंगर, दऱया, मध्येच पठारी प्रदेश अशी इथली भौगोलिक रचना आहे. विशालकाय ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या भरेली आणि पाके यांनी हा प्रदेश सुजलाम् सुफलाम् बनवला आहे.

धनेश किंवा हॉर्नबिल ही पाकेची प्रमुख ओळख. हिंदुस्थानात या पक्ष्यांच्या एकूण नऊ जाती आढळतात. त्यापैकी ग्रेट ऱिहदड, रूफस नेक्ड आणि ओरिएंटल पाईड हॉर्नबिल या चार जाती पाकेच्या जंगलात आढळतात. इथल्या भेलू भोरपाव आणि जुतली या झाडांवर धनेश पक्षी घरटी करतात. मार्चपासून त्यांचा विणीचा हंगाम सुरू होतो. पूर्वी धनेशच्या मोठाल्या चोचींसाठी त्यांची सर्रास शिकार केली जायची. मात्र आता वन विभाग, संशोधक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे स्थानिकांना धनेशच्या शिकारीपासून परावृत्त करण्यात बरंचसं यश मिळालंय.
धनेशव्यतिरिक्त इतर सुमारे 300 प्रकारचे पक्षी पाकेच्या जंगलात आढळतात. त्यात जागतिक पातळीवर अस्तित्व धोक्यात आलेल्या व्हाईट-विंग्ड वुड डक, आयबिस बिल आणि ओरिएंटल बे आऊलचा प्रामुख्याने समावेश होतो. याशिवाय जेरडन्स बझा, पाईड फाल्कोनेट, एशियन एमराल्ड ककू, रेड-हेडेड ट्रोजोन, कॉलर्ड ब्रॉडबिल, लाँग-टेल्ड ब्रॉडबिल, ब्ल्यू-नेप्ड पिट्टा, डॉरिअन रेडस्टार्ट, रुबी-चिक्ड सनबर्ड, मरून ओरिएल, क्रो-बिल्ड ड्रोंगो इत्यादी अनेक पक्षी दिसतात.
पाकेच्या जंगलात सस्तन वन्य प्राण्यांच्या सुमारे 40 प्रजाती आहेत. त्यात अर्थातच सर्वोच्च स्थानावर आहे वाघ. व्याघ्र प्रकल्पामुळे वाघांना कायदेशीर संरक्षण मिळाल्यानं त्यांची संख्या वाढते आहे. मात्र वाघापेक्षाही दुर्मिळ असा एक प्राणी इथं निवास करतो. तो म्हणजे क्लाऊडेड लेपर्ड, हिमालयीन जंगलांची शान असलेला हा मार्जार कुळातला प्राणी ज्यांना दर्शन देतो, ते वन्य जीवप्रेमी स्वतःला धन्य मानतात! याव्यतिरिक्त पाकेमध्ये बिबटय़ा, रानकुत्रे, रानमांजर, लांडगा, रानडुक्कर, हिमालयीन काळं अस्वल, हत्ती, रानगवा, सांबर, भेकर, माकड,लंगून, शेकरू, उडती खार इत्यादी प्राणीही पाहायला मिळतात. देखण्या यलो थ्रोटेड मार्टेनच्या दर्शनाने जीव सुखावतो. या जंगलात सुमारे 36 प्रकारचे सरपटणारे प्राणी, तर 30 प्रजातींचे उभयचर प्राणी आढळतात. हिंदुस्थानात सापडणाऱया फुलपाखरांच्या 1500 प्रजातींपैकी किमान 500 प्रजाती एकटय़ा पाकेच्या जंगलात सापडतात. वन्य जीवांची अशी ही संपन्न विविधता इथं असली, तरी संशोधकांच्या मते या जंगलाचे अंतरंग अजूनही पुरते उलगडले गेलेले नाहीत. पाकेच्या पोटात आणखी बरंच काही जे आजही अज्ञात आहे. कारण वन विभाग आणि संशोधकांचं काम प्रामुख्यानं 100 ते 500 मीटर उंचीवरच्या जंगलापुरतंच मर्यादित राहतं. त्यापलीकडलं जंगल अद्याप मानवी संपर्कापासून दूर आहे.

वन विभाग, संशोधक, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यातून जंगल संपत्तीचं जतन कसं करता येतं याचा आदर्श नमुना इथं आपल्याला पाहायला मिळतो. स्थानिक निशी जमातीचे आदिवासी शिकार सोडून जंगल वाचवण्याचं काम करतात. सर्व गावांच्या सरपंचांची समिती आणि महिला बचत गट यांनी या कामात पुढाकार घेतलाय. शिकार करणाऱयांना दंड केला जातो. धनेशच्या चोचीऐवजी फायबरच्या चोचींच्या टोप्या बनवल्या जातात. बेकायदेशीर गोष्टींची सूचना तातडीने वन विभागाला दिली जाते. देशातल्या इतर जंगलांच्या आसपास राहणाऱया ग्रामस्थांनी पाकेच्या जंगल व्यवस्थापनातून धडा घेतला तर इतरही जंगलं अशीच सुरक्षित राहू शकतील.
पाके वन्य जीव अभयारण्य
प्रमुख आकर्षण…धनेश, वाघ
जिल्हा…पूर्व कमिंग
राज्य…अरुणाचल प्रदेश
क्षेत्रफळ…862 चौ. कि.मी.
निर्मिती…1966
जवळचे रेल्वे स्थानक…सोईबरी (36 कि.मी.)
जवळचा विमानतळ…तेजपूर (50 कि.मी.)
निवास व्यवस्था… वन विभागाचं विश्रामगृह
योग्य हंगाम…नोव्हेंबर ते एप्रिल
सुट्टीचा काळ…पावसाळा
साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही
























































