ब्लॉग : हिप-हॉपचा धांगडधिंगा!

>>ज्योत्स्ना गाडगीळ<<

सध्या जमाना व्हायरलचा आहे. पूर्वी फक्त आजार व्हायरल व्हायचे. आता इंटरनेटमुळे छोट्या-मोठ्या गोष्टीही व्हायरल होऊ लागल्या आहेत. ह्याला सोशल मीडियाचा परिणाम म्हणा, नाहीतर दुष्परिणाम, पण लागण लागलीये खरी! तर सध्या साथ आलीये हिप-हॉप आणि रॅप म्युझिकची!

`गली बॉय’ चित्रपटामुळे गल्लीबोळातल्या तरुणाला `अपना टाईम आएगा’ अशी खात्री वाटू लागली आहे. सदर चित्रपटात रणवीर सिंगने धारावीतल्या मुरादची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याचे हिप-हॉप संगीताबद्दल प्रेम आणि रॅपस्टार बनण्याचा प्रवास तरुणांच्या हृदयाला हात घालणारा आहे. चित्रपटाचा विषय छान आहे. मुरादची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. रॅपसाँगमधून सामाजिक प्रश्नांना हात घालण्याचाही प्रयत्नही स्तुत्य आहे. मात्र त्याला जोडून आलेल्या हिप-हॉप संगीताचा उदो-उदो अनाठायी वाटतो.

हिप-हॉप संगीत हा पाश्चिमात्य देशातला लोकसंगीत प्रकार आहे. शास्त्रीय संगीताच्या तुलनेत लोकसंगीत जनमानसाच्या हृदयाचा चटकन ठाव घेते. कारण, ते संगीत कोणीही, कसेही आळवू शकते. त्याला नियमांची चौकट नसते. निखळ आनंद हा त्याचा मूळ हेतू असतो. जसे आपल्याकडे लावणी, कोळीगीत, जागरण-गोंधळाची गाणी लोकसंगीत प्रकारात मोडतात, तसे पाश्चात्य देशातील लोकसंगीत प्रकारामध्ये हिप-हॉप आणि रॅप संगीताचा समावेश केला जातो.

विशिष्ट शैलीत वेगाने तालात गायलेले रॅप सॉँग हा तर रॅप साँगचा आत्मा आहे. बीटबॉक्सिंग म्हणजे तोंडाने आवाज काढून निर्माण केलेल्या संगीतावर वेगवेगळ्या गाण्यांचे किंवा संगीताचे मिक्सिंग, ग्राफिटी, त्याला साजेशा (?) फॅशन-पेहराव हा हिपहॉपचा भाग असतो. तर हे परदेशात प्रचलित असलेले लोकसंगीत आपल्याकडे प्रचलित होण्याचे कारण काय? तर निव्वळ अंधानुकरण! आपली कोळीगीते, लावण्या परदेशात प्रचलित झाल्यात का? नाही! पण आपण मात्र दीडशे वर्षें गुलामगिरीत राहिल्याने त्यांच्या सगळ्याच गोष्टींबद्दल आपल्याला कौतुक वाटते आणि त्याचे अनुकरण करण्यात धन्यता वाटते.

1970 च्या काळात न्यूयॉर्कमध्ये ब्रॉन्क्स शहरात `हिप-हॉप’ ह्या सांगीतिक चळवळीला सुरुवात झाली. पाश्चात्य देशात वर्णभेद सुरूच होता. तेव्हा अल्पसंख्याकांना, कैद्यांना मिळणारी वागणूक निकृष्ट दर्जाची आणि जुलमी पद्धतीची होती. त्यावेळेस मनातली खदखद बाहेर काढण्यासाठी तरुणांनी संगीताचे माध्यम वापरले आणि त्याला नृत्याची जोड दिली. त्यातून सुख-दु:खाची वाच्यता होऊ लागली आणि हा संगीतप्रकार परदेशात प्रचलित झाला.

नव्वदीच्या दशकात बाबा सैगल ह्या गायकाने हिप- हॉपच्या धर्तीवर काही अलबम आणले. एका विशिष्ट वर्गात ते गाजलेही. जसे की, `ठंडा ठंडा पानी’, `दिलरुबा’, `मैं भी मॅडोना’, `मंजुला’, `दिल धडके’ इ. इ…मात्र त्यापैकी लक्षात किती राहिले हा प्रश्न आहेच. बॉलीवूडमध्येही रॅप, हिप-हॉपचे प्रयोग झाले. `काला चष्मा’, `चतुर नार’, `डीजेवाले बाबू मेरा गाना चला दे’, `पार्टी ऑल नाईट’, `आज ब्लू है पानी’ अशी गाणी तरुणांच्या ओठावर तात्पुरती रुळली, मग विस्मरणात गेली. या गाण्यांमुळे यो यो हनी सिंग, मिका सिंग, बादशाह, हार्ड कौर, रफ्तार ह्या रॅप गायकांना काही काळापुरते का होईना, अच्छे दिन आले होते. परंतु ही गाणी जास्त काळ जनमानसावर पगडा घेऊ शकली नाहीत. का? ह्याचा खुलासा केला, संगीतकार अनंत जोशी ह्यांनी.

`एक काळ होता, जेव्हा पं. रवि शंकर ह्यांनी परदेशात शास्त्रीय संगीत वाजवून तिथल्या लोकांना हिंदुस्थानीय संगीताचे वेड लावले. ते संगीत शिकण्यासाठी परदेशातून लोक हिंदुस्थानात आले. आता, लोक परदेशातून आलेल्या संगीताचे अनुकरण करत आहेत. मात्र, जे आपले संगीत नाही, ते इथल्या मातीत कसे रुजणार आणि कसे रुतणार? तग तरी कसे धरणार? केवळ ते पाश्चात्य आहे, तरुणांमध्ये त्याची क्रेझ आहे. त्याला नियमांची चौकट नाही म्हणून ते चांगले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. लोकांचे काय, त्यांना जे दाखवाल, ते ती निमुटपणे पाहतात. त्यात अशा प्रकारांचा मारा होत राहिला तर तो ट्रेंड सुरू आहे, असे चित्र भासवतात. वास्तविक तसे नसते. अभिरूचीसंपन्न लोक अजून आहेत. त्यांना चांगले संगीत, चांगले काव्य, चांगले गायक दिले तर ते नाही का ऐकणार? ह्याचा अर्थ हिप-हॉप संगीत वाईट आहे असे नाही, तर ते आपले संगीत नाही, हे भान आपण ठेवले पाहिजे.

`नियमांच्या चौकटीत राहून नावींन्यपूर्ण कलाकृती करणाऱ्या व्यक्तीची वाहवा होते. हिप-हॉपच्या बाबतीत सगळाच सावळा गोंधळ आहे. गाण्याला नियम नाही. ठेका समेवर येण्यावर बंधन नाही, काव्याला शब्दमर्यादा नाही, गायकाला सुस्वर असावा अशी अट नाही, असे सर्व बाजूंनी पसरलेले गाणे किती काळ स्मरणात राहील? अलीकडे शास्त्रीय संगीतातले लोक रॅप स्टाईलने सादरीकरण करू लागले आहेत. हेच संगीत आपण पाश्चात्य लोकांसमोर मांडले, तर तेही विचारतील, ह्यात तुमचे वैशिष्ट्य काय? ही तर आमची शैली आहे! मग त्यांच्या देशात जाऊन त्यांचीच शैली आपण मांडणार असू, तर आपली स्वतंत्र ओळख काय राहाते? पाश्चात्य लोकांनी आपले कोळीगीत, गोंधळ, भारूड, पोवाडा सादर केल्याचे ऐकीवात आहे का? नाही ना? जर ते आपल्या संगीताशी एकनिष्ठ राहू शकतात, तर आपण का नाही? हा विचार तरुणांनी केला पाहिजे.’

जोशी ह्यांचे विचार नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. पण लक्षात कोण घेतो? इथे गल्ली-बोळात रॅपर्सचा सुळसुळाट सुरू झाला आहे. एवढेच नाही, तर मुंबई विद्यापीठानेही `हिप-हॉप’ आणि `रॅप’ संगीताचे शास्रोक्त प्रशिक्षण देण्याचे घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिप-हॉपचे जाणकार हा अभ्यासक्रम शिकवणार आहेत. आशियाई देशात हिप-हॉपचे प्रशिक्षण देणारे एकही विद्यापीठ किंवा अभ्यासक्रम नाही. तो अभ्यासक्रम महाराष्ट्रात सुरू होत आहे, याबद्दल आनंद व्यक्त करावा की काळजी, हेच कळत नाही.

एकट्या धारावीत 25000 अंडरग्राऊंड रॅपर्स आहेत. तिथल्या 10 पैकी 7 मुलांना रॅपर्स व्हायचे आहे. मराठी मुलांचाही ह्यात लाक्षणिक सहभाग आहे. `मराठी वाचवा, मराठी जगवा, मराठी वाढवा’ असे संदेश देणारी गाणी, अर्थात रॅप साँग मराठी मुले लिहीत आहेत, गात आहेत आणि नाचत सादर करत आहेत.

आजच्या तरुणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे माध्यम म्हणून हिप-हॉपचा स्वीकार केला. मात्र त्याऐवजी आपल्या लोकसाहित्याचा थोडा अभ्यास केला असता, तर ताला-सुरात बांधलेले देसी रॅप व्हर्जन इथेही आढळले असते. कीर्तनकार भजन सुरू असताना ताल-सूर सुरू ठेवत, लयबद्ध शब्द टाकत एखादा दाखला देतात, तो इतका श्रवणीय असतो, की ऐकणाराही ताल धरू लागतो. तिच बाब वगनाट्य, शाहिरी, पोवाड्यातली! एवढेच काय, तर शास्त्रीय संगीतातील बंदिशीतदेखील ताना, बोलताना, लयकारी रॅपच्या अंगानेच जाणारी असते. त्यातले शास्त्र शिकून घेतले आणि नामवंत गायकांची जुगलबंदी ऐकली, तर तेवढीच रसोत्पत्ती हिंदुस्थानीय संगीतात मिळू शकते. दुर्दैवाने, चांगल्या गोष्टींचा प्रचार-प्रसार होत नाही. त्या मर्यादित राहतात आणि बाहेरील गोष्टी आक्रमण करतात. अर्थात, त्याचा परिणाम अभिजात संगीतावर कधीच होत नाही, होऊ शकतही नाही. कारण हिंदुस्थानी संगीताची पाळेमुळे इथल्या मातीत घट्ट रुजली आहेत. त्यामुळे हिप-हॉप असो, नाहीतर रॅप, त्याचा धुमाकूळ फार काळ टिकु शकणार नाही, हे नक्की!

नृत्याकडे झुकणारे संगीत : हिप-हॉप, रॅप हा संगीतप्रकार असला, तरी तो नृत्याकडे जास्त झुकणारा आहे. त्यात बीट बॉक्सींग, डीजेर्इंग, ग्राफीटी आणि रॅप असे प्रकार आहेत. गबाळे कपडे, हातात माईक आणि आवेशपूर्ण शब्दपेâक असे रॅपर्सचे रूपडे असते. ते पाहता हिप-हॉप सादरीकरण करणारे कलाकार गांजा विंâवा तत्सम अमली पदर्थांचे सेवन करून गाणे सादर करतात, असा मोठ्या प्रमाणात लोकांचा समज झालेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या