
सामना प्रतिनिधी, कल्याण
छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 ऑक्टोबर 1654 रोजी वसुबारसेच्या मुहूर्तावर कल्याणच्या खाडीत आरमाराची स्थापना करीत मराठा नौदलाची पहिली बोट दुर्गाडीच्या साक्षीने समुद्रात उतरवली. या घटनेला आज 361 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एतिहास संकलन समितीतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे यांच्या हस्ते दुर्गाडी खाडीमध्ये विधिवत जलपूजन करण्यात आले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना रघुजीराजे म्हणाले, केवळ स्मारक किंवा प्रतिके उभारण्यापेक्षा शिवरायांच्या कार्याचा संदेश लोकांपर्यंत जाणे फार महत्त्व आहे. याबरोबरच शिवरायाचे शिकवण प्रत्येकाने आपल्या अंगी बाळगणे हीच त्यांच्या कार्याला पोचपावती ठरेल.
दुर्गाडी परिसरात इतिहासाच्या अभ्यासासाठी एखादे केंद्र उभे राहावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी सांगितले. याप्रसंगी शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





























































