52 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, कल्याण बाजार समितीसाठी 85 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, कल्याण

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज सरासरी 85 टक्के मतदान झाले. 16 जागांसाठी 52 उमेदकारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून उद्या सोमवारी बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये मतमोजणी होणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही निवडणूक होत असल्याने त्यास राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व राहणार याचा फैसला उद्या होणार आहे.

शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढवली असून राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी आघाडी होती. नवीन शासन नियमानुसार शेतकरी असणारी व्यक्तीच बाजार समितीचा सभासद आहे. 18 हजार सातशे सभासद मतदानासाठी पात्र होते. 18 गणांपैकी 15 गण शेतकऱ्यांसाठी राखीव होते. बाकेघर, फळेगाव, कुंदे, वाघेली, रायते, गोवेली, खडवली, टिटवाळा, मांडा, बल्याणी, बाराके, कल्याण, आयरे, निळजे, नांदिवलीतर्फे पाचानंद हे शेतकरी वर्गासाठी तर व्यापारी – अडते वर्गासाठी 2 आणि हमाल – मापाडी वर्गासाठी 1 गण राखीव होता. यातील बाकेघर आणि आयरे दोन गण बिनविरोध झाल्याने 16 गणांसाठी आज मतदान झाले.

सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. गेले 15 दिवस उडलेला प्रचाराचा धुरळा मतदानानंतर शांत झाला. शिवसेनेच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी आघाडी होती. मात्र आज प्रत्येक मतदान केंद्रावर शिवसेनेच्या उमेदवारांचा जोर पहावयास मिळाला. पाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर 85 टक्के मतदान झाले. आता उद्या बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

मतपेटीला आग
मतपत्रिकांच्या पेटय़ा बाजार समितीत आल्यानंतर धक्कादायक घटनेने प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. तत्काळ पेटी उघडण्यात आल्यानंतर आत मतपत्रिका जळत असल्याचे लक्षात आले. वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जवळपास 350 मतपत्रिकांपैकी 25 मतपत्रिका जाळल्या. आता या गटात नव्याने निवडणूक घेण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकरी शहाजी पाटील यांनी सांगितले. पेटीत आग नेमकी कशामुळे लागली, यामागे काही षडयंत्र आहे का, याची चौकशी होणार आहे.