कान्हूर मेसाई विद्यालयात शालेय पोषण आहार पुन्हा सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्या विकास मंडळ संचालित विद्याधाम माध्यमिक विद्यालयातील ४१ विद्यार्थ्याना मागील आठवड्यात शालेय पोषण आहाराचा भात खाल्यानंतर उलट्या व मळमळीचा त्रास झाला होता. शाळा प्रशासन व ग्रामस्थानी या सर्वांना तातडीने खाजगी व शासकीय आरोग्य सेवा मिळवून दिल्याने ते सर्व दोनच दिवसात ठणठणीत बरे झाले. नाताळच्या सुट्टीनंतर काल विद्यालय सुरु झाले. विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष भास्कर पुंडे यांनी संस्थेचे सर्व संचालक, मुख्याद्यापक मच्छिन्द्र माने व शिक्षकांसह तातडीने बैठक घेऊन शालेय पोषण आहाराचे काम येथील सहेली महिला बचत गटाकडे योग्य त्या सूचना देत त्यांना दिले. आज शुक्रवार दि.२८ रोजी तयार करण्यात आलेला पोषण आहारातील खिचडी भात दुपारी विद्यार्थ्याना वितरीत करण्यात आला. एकूण ३१४ विद्यार्थ्यानी या शालेय पोषण आहाराचा लाभ घेतला. सहेली महिला बचत गटाकडे पोषण आहाराचे काम नव्याने दिले असून हे काम लक्षपूर्वक करणार असल्याचे अध्यक्षा प्रमिला कुलथ यांनी सांगितले.तर भविष्यात विद्यार्थ्याना कुठल्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता शालेय प्रशासन घेईल असे अश्वासन संस्थेचे अध्यक्ष भास्कर पुंडे व जेष्ठ शिक्षक अनिल शिंदे यांनी दिले.

पोषण आहार घेतलेल्या काही विद्यार्थ्याना प्रत्यक्ष विचारले असता आजचा खिचडी भात चांगला असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यानी दिली. यावेळी कान्हूर मेसाईचे पोलीस पाटील कमलेश शिर्के, जेष्ठ शिक्षक अनिल शिंदे, कविता चौधरी-पुंडे, यशवंत टकले, प्रकाश चव्हाण, दीपक मोरे, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. तर आगामी दोन दिवसांत शाळेतील विद्यार्थ्याना आर ओ मशीन द्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा देखील तातडीने सुरु करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष भास्कर पुंडे यांनी सांगितले.