
रॅपिड टेस्ट आणि आरोग्य विभागाकडे करण्यात येणारी नोंदणी टाळण्यासाठी चाकरमान्यांनी आता नामी शक्कल लढवली आहे. रेल्वे स्थानकात उतरल्यावर मागच्या बाजूने संरक्षक कठडय़ावरून हळूच उडय़ा टाकून कलटी मारण्याचा धक्कादायक प्रकार कणकवलीत समोर आले आहे. यामुळे कोरोना रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
रेल्वेने आलेल्या काही प्रवाशांनी नियमित मार्गाचा वापर न करता संरक्षक कठडय़ाच्या वरून स्थानकाबाहेर जाण्याचा मार्ग काढला. याबाबत काहींनी कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी या सर्व गोष्टी कुठे बघू. यासाठी रेल्वे पोलीस आहेत असे सांगत जबाबदारी झटकली.
अहवाल निगेटिव्ह असेल तर हा मार्ग कशासाठी?
z प्लॅटफॉर्मलगत असलेल्या सिमेंटच्या कुंपणावरूनच रेल्वे प्रवासी थेट आरोग्य विभागाची तपासणी टाळून जात असतील तर कोरोना रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यासारखे होणार नाही का? अहवाल निगेटिव्ह असेल तर अन्य मार्गांचा उपयोग करण्याची गरज काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
































































