
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला विकासाची नवी दिशा दिली आहे. ती दिशा सातारा जिह्याच्या विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी पेटून उठले पाहिजे. दोन-तीन महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत. त्यासाठी शिवसैनिकाने आठवडय़ातील फक्त दोन दिवस पक्षासाठी दिल्यास सत्तेसाठी कुणाच्याही कुबडय़ा घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात शिवसेनेच्या वतीने कराड शहर, दक्षिण, उत्तर व पाटण तालुका पदाधिकारी, शिवसैनिकांच्या शिवसंपर्क मेळाव्यात मंत्री सामंत बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उपनेते, सांगली-सातारा जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, कराड तालुका संपर्कप्रमुख संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, तालुकाप्रमुख रामभाऊ रैनाक, शंकर संकपाळ, कराड शहरप्रमुख शशिराज करपे, माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, संजय चव्हाण, रवि हिनुकले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अनिता जाधव, कुलदीप क्षीरसागर उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, प्रत्येक गावागावापर्यंत व घराघरापर्यंत शिवसैनिकांच्या माध्यमातून केलेले काम पोहोचवण्याची जबाबदारी सर्व शिवसैनिकांनी पार पाडायची आहे. जिह्यातील शिवसैनिक पेटला तर तो काय करू शकतो, हे जिह्याने पाहिले आहे. त्यामुळे जिह्यात शिवसेनेची घोडदौड आणखी जोरदार सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बानुगडे-पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून जिल्हाभरात अनेक विकासकामे झाली आहेत. शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिह्यासाठी आतापर्यंत 750-800 कोटी रुपयांचा निधी आला आहे. ही विकासकामे शिवसैनिकांनी लोकांपर्यंत पोहोचवायला हवीत, असेही ते म्हणाले.





























































