
ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या आपल्या साथीदाराला सोडविण्यासाठी चोरट्याने गोळीबार केल्याची घटना कर्जत तालुक्यातील निंबोडी गावात घडली आहे. या घटनेत दोनजण जखमी झाले असून, गोळीबारानंतर साथीदाराला घेऊन चोरटे फरार झाले आहेत. खंडू गणपत गरड (50) व भरत बर्डे (35) अशी जखमींची नावे असून, ते मामा-भाचे आहेत.
निंबोडी गावामध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरटे आले होते. शेळी चोरून घेऊन जात असताना प्रदीप गरड जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने त्यांचे नातेवाईकही जागे झाले. चोरट्यांनी शेळी घेऊन धूम ठोकली; परंतु जमलेल्या सहाजणांनी त्यांचा पाठलाग करून एकाला पकडले. त्याचे दोन साथीदार पळून गेले. मात्र, काही वेळाने ते परत आले. पकडलेल्या साथीदाराला सोडा; अन्यथा गोळ्या घालू, अशी धमकी त्यांनी दिली.
ग्रामस्थांनी मात्र त्यास नकार दिल्याने चोरटय़ांनी त्यांच्याकडील गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यात एक गोळी खंडू गरड यांच्या कान आणि जबडय़ाला चाटून गेली, तर भरत बर्डे याच्या पोट व बरगडीला घासून गेली आहे. या गडबडीत पकडलेल्या साथीदारासह तीन चोरटे पळून गेले. जखमींना उपचारांसाठी नगरला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी बापू गरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































