
सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली
26/11 च्या हल्ल्यात फाशीची शिक्षा झालेल्या अमजल कसाबला खोल समुद्रात सागरी प्रशिक्षण देण्यात आलं. अगदी मासेमारीही शिकवली. कसाबला वाटलं आपल्याला बोटीवरचं नवीन काम मिळाले, आता सन्मानाने पैसे कमवू शकतो. मात्र ही नेमकी कसली तयारी आहे, कुठं जायचंय, कसाबला कसलाच थांगपत्ता नव्हता. अशा एक ना अनेक धक्कादायक बाबी सरोज कुमार यांच्या फ्रेजल फ्रंटियर्स- द सिक्रेट हिस्ट्री ऑफ मुंबई टेरर अटॅक या पुस्तकातून उघड होणार आहेत.
अजमल कसाबला अटक झाल्यानंतर पोलीस तपासात त्याने महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यावर आधारित पुस्तक सरोज कुमार यांनी लिहिलं आहे. लष्कर-ए- तोयबा कसाब आणि त्याच्या सहकाऱयांच्या सागरी हल्ल्याची योजना नोव्हेंबर 2008 पर्यंत अत्यंत गुप्त ठेवली होती. सप्टेंबर 2008 मध्ये अतिरेक्यांना घेऊन जाणारी बोट खडकावर आदळली आणि हल्लेखोर समुद्रात वाहून गेले.
त्यांना बचावकार्य करून वाचवण्यात आले. असाच एक प्रयत्न 7 नोव्हेंबर 2008 रोजी झाला होता. हिंदुस्थानच्या बोटीचा कॅप्टन लष्कर-ए- तोयबासमोर शरणागती पत्करायला तयार नव्हता, तो पळून गेला. पाकिस्तानात कसाबसारखी तरुण मुले अतिरेकी का बनतात, या हिंसेंच्या मार्गावरून चालायला त्यांना कोण प्रवृत्त करतो. हा मार्ग नेमका कुठून कुठे जातो, या साऱयांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न फ्रेजल फ्रंटियर्स- द सिक्रेट हिस्ट्री ऑफ मुंबई टेरर ऍटॅक या पुस्तकातून केला आहे. रुटलेज इंडियाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची किंमत 995 रुपये आहे.
जर चौकशी झालीच तर हिंदुस्थानच्या नौदलाची दिशाभूल करण्यासाठी जाळं कसं फेकायचे, याचे खास प्रशिक्षण देण्यात आले. कसाबने मे आणि जुलै 2008 या दोन महिन्यांत समुद्री प्रशिक्षण घेतले. याव्यतिरिक्त रायफल कशी चालवायची आणि अन्नाशिवाय 60 तास कसे काढायचे. पाठीवर ओझे घेऊन डोंगर कसा चढायचा हेदेखील त्याला शिकवण्यात आले.
सरोज कुमार यांच्या पुस्तकात अजमल कसाब- द एलईटी साईड ऑफ दी स्टोरी हे प्रकरण आहे. त्यामध्ये कसाबच्या दोन वर्षांच्या प्रशिक्षणाची माहिती दिली आहे. मुंबई हल्ल्यासाठी 10 अतिरेक्यांची निवड झाली होती. त्यांना चार टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सागरी प्रशिक्षणही दिले गेले. यामध्ये नकाशा कसा समजून घ्यायचा, पाण्याची खोली कशी मोजायची. सागरी मार्गाची जीपीएस यंत्रणा कशी वापरायची, मासे पकडण्यासाठी जाळे कसे फेकायचे, बोट कशी चालवायची हे शिकवण्यात आले.


























































