कासारशिरसी ते कोराळी रस्त्याच्या कामास मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

औसा विधानसभा मतदारसंघातील व निलंगा तालुक्याअंतर्गत कासारशिरसी ते कोराळी या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याच्या कामास तातडीने मंजुरी दिली. त्यामुळे कासारशिरशी ते कोराळी या ७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

कासारशिरसी व कोराळी ही गावे कर्नाटकाच्या सीमेलगत आहेत. या परिसरातून जाणारा इतर जिल्हा मार्ग ९४ हा अतिशय खराब झाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा असला तरी खराब झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यात जमा आहे. रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोजच्या कामासाठी प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात न्यावयाचे असेल तर ते अशक्य आहे. रस्ता खराब असल्याने खाजगी वाहनधारकही या परिसरात येण्यास नकार देत आहेत. केवळ रस्त्यामुळे हा भाग इतर परिसरापासुन बाजूला पडला आहे.

अभिमन्यू पवार काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त कासारशिरसी येथे गेले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन हा रस्ता दुरुस्त करावा, नागरिक व प्रवाशांची अडचण दूर करावी, अशी मागणी केली होती. यावरुन पवार यांनी त्या रस्त्याची पाहणी केली. छायाचित्रे काढुन घेतली. मुंबईत गेल्यानंतर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या विनंतीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा रस्ता तातडीने दुरुस्त करून डांबरीकरण करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संशोधन व विकास प्रकल्पात या रस्त्याचा समावेश करावा तसेच या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे कासारशिरसी व कोराळी परिसरातील नागरिक व प्रवाशांच्या अडचणी दूर होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र व कर्नाटकातील वाहतूक व दळणवळण गतिमान होणार आहे.