
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई शिवारातील नगर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश बाबुराव इचके (वय 35) रा. म्हाळोबा असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण रात्री नऊ च्या सुमारास रस्त्याने जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली यात गंभीर दुखापत झालेल्या गणेशचा मृत्यू झाला.
गणेशचा भाऊ सुनील बाबुराव इचके ( वय 55 ) यांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरुद्ध अपघाताची खबर न देता व जखमीला मदत न करता निघून गेल्याबद्दल शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलीस नाईक टेंगले पुढील तपास करीत आहेत.



























































