
हसणे हे आरोग्यासाठी चांगले असते असे म्हणतात, मात्र हसण्यासाठी कोणी जबरदस्ती करू शकत नाही. मात्र एक देश असा आहे जिथे हसण्याची जबरदस्ती करण्यात आली आहे. फिलिपाईन्समधल्या ‘मुलाने’ शहराचे महापौर ऍरीस्टॉटल अग्युरे यांनी आदेश काढला आहे. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना हसत हसत काम करावे लागेल. असे न केल्यास त्या कर्मचाऱ्याला दंड ठोठावण्यात येईल अशी ताकीदही देण्यात आली आहे. जो हा आदेश मानणार नाही त्याचा 6 महिन्यांचा पगार कापण्यात येणार आहे. अग्युरे यांना सरकारी सेवा सुविधांचा स्तर उंचावायचा आहे. जेव्हा सर्वसामान्य नागरिक सरकारी कार्यालयात येतात तेव्हा त्यांना प्रसन्न वाटले पाहिजे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे असे अग्युरे यांचे म्हणणे आहे.



























































